नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांच्या भांडणात भांडण करू नका रे पोरांनो असे म्हणणे एका 72 वर्षीय महिलेला अत्यंत महागात पडले.भांडण करणाऱ्या युवकांमधील एकाने त्यांच्या शरिरावर मारलेल्या दगडाने त्यांचा जिव गेला.न्यायालयात फिर्यादीसह सर्व साक्षीदार फिरले असतांना सुध्दा तपासीक अंमलदाराच्या शब्दावर का अविश्र्वास करू अशी नोंद निकाल पत्रात करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी वृध्द महिलेला मारहाण करणाऱ्या युवकास 10 वर्ष सक्तमजुरी आणि 18 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
रामनगर किनवट येथे 23 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान बाबु नारायण बैनवाड आणि त्याचा भाऊ गजू बैनवाड आपसात भांडत होते. त्यावेळी वृध्द महिला चंद्राबाई नागन्ना गोलेवार यांनी त्या दोघांना भांडण करू नका रे पोरांनो असे सांगिेतले. तेंव्हा बाबु नारायण बैनवाडने तुला काय करायचे थेरडे असे म्हणत दगडाचा उपयोग करून चंद्राबाईच्या गालावर, त्यांच्या चाळ्यावर, मानेवर, मारहाण केली. त्या खाली पडल्या तेंव्हा त्यांची सुनबाई वनमाला या आपल्या सासुला धरुन बसल्या असतांना बाबु बैनवाडने वनमालाच्या पायावर विटकर मारुन त्यांनाही जखमी केले. या प्रकरणी सुरूवातीला किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2019 दाखल झाला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची 324, 504, 337 या कलमा जोडल्या होत्या. चंद्राबाईंचा इलाज करण्यासाठी खाजगी दवाखान्याकडे त्यांना पाठवले. पण खर्च झेपत नाही म्हणून त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर 28 एप्रिल 2019 रोजी त्यांना घरी नेत असतांना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला आणि त्यानंतर या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 302 ची वाढ झाली. या गुन्ह्याचा तपास किनवटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांनी पुर्ण केला.
नांदेडच्या जिल्हा न्यायालयात बाबु नारायण बैनवाड (37) विरुध्द दाखल झालेला सत्र खटला क्रमांक 274/2019 अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या न्यायालयात आज पुर्णत्वाला गेला. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. या खटल्यातील मयत महिला चंद्राबाई गोलेवार यांचा पुत्र भुमन्ना नागन्ना गोलेवार हा फिर्यादी आहे. त्याच्यासह इतर पाच साक्षीदार आपल्या साक्षीवर उलटले. न्यायालयाने त्यांना फितूर घोषीत केले. आपण केलेला तपास, घडलेली घटना, जमा केलेले कागदपत्र अत्यंत उत्कृष्टपणे मांडत सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांनी आपला जबाब न्यायालयात नोंदवला. या प्रकरणात एक सोडून सर्वचे सर्वच साक्षीदार फितूर झाले होते. तरी पण न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी मी प्रकरणाचे तपासीक अंमलदार यांच्या जबानीवर का अविश्र्वास ठेवू अशी नोंद निकाल पत्रात करत वृध्द महिलेच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या बाबू नारायण बैनवाडला भारतीय दंड संहितेच्या कलम 304 प्रमाणे बाबूचा चंद्राबाईचा खून करण्यात उद्देश नव्हता म्हणून दहा वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. सोबतच कलम 324 नुसार तीन वर्ष सक्त मजुरी आणि 7 हजार रुपये रोख दंड ठोठावला. कलम 337 प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये रोख दंड तसेच कलम 504 नुसार तीन महिलेने सक्तमजुरी आणि 500 रुपये रोख दंड अशा चार शिक्षा दिल्या. या सर्व शिक्षा बाबू बैनवाडला एकत्रीत भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी मांडली. आरोपीच्यावतीने ऍड.डी.के.हंडे यांनी काम पाहिले.