ग्रामीण महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन समन्वयातून व्यापक चळवळ निर्माण करू- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

महत्वाच्या बातम्या





 

▪️कृषी व महिला उद्योजकता नाविन्यता परिषद संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हा कृषि उत्पादनाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहे. शेती उत्पादनातील विविधता व उत्पादने लक्षात घेता शेतीपूरक उद्योग व विशेषत: महिलाबचगटांना यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. शासनाच्या विविध योजनेंतर्गत महिला बचतगटांनी बाजारपेठेच्या तोलामोलाची उत्पादने तयार केली असून त्यांना आता ब्राँडिग, पॅकेजिंग, वितरणप्रणाली याबाबत मार्गदशनाची गरज आहे. यासाठी इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञ, कृषि विभाग, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इतर विभागाने यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त इन्क्युबेशन सेंटर, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व महिला उद्योजकता नाविन्यता परिषदेचे आयोजन आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड, संसाधन व्यक्ती (सेबी) चे ऋषिकेश कोंडेकर, लक्ष्मीकांत माळोदकर, समाजशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रमोद लोणारकर, गजानन पातेवार, अशोक सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

*महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायाकडे वळावे*
– कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

 

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असून सर्व विभागाच्या सहाय्याने एक चांगले कार्य यातून निर्माण होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कृषी क्षेत्रातील संधीबाबत माहिती दिली.

सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी महिला सक्षमीकरणाविषयी आपले मत मांडून महिलांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना आवश्यक बळ दिले पाहिजे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऋषिकेश कोंडेकर यांनी उत्पादनाची प्रसिद्धी व विक्री कौशल्याविषयी तर लक्ष्मीकांत माळवदकर यांनी उद्योग विषयातील पायऱ्या या विषयावर माहिती दिली. त्यांनतर महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेवून बक्षीस वितरीत करण्यात आले व महिलांनी स्वत:चा व्यवसाय कसा करावा याबाबतची माहिती देण्यात आली.



Post Views:
121








Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *