एकमत ऑनलाईन
लातूर : योगिराज पिसाळ
लातूर जिल्ह्यातील ५ सहकारी साखर कारखान्यांनी तर ६ खाजगी साखर कारखान्यांचा ऊस गाळपाचा गळीत हंगाम जोमात सुरू आहे. जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी दि. ९ मार्चपर्यंत ३९ लाख १७ हजार ४७४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३९ लाख १५ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून साखर उतारा १० टक्के राहिला आहे. ट्वेंटीवन शुगर कारखान्याने ७ लाख २५ हजार ७०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. गेल्या वर्षी ८८६.९० मिली मीटर पाऊस झाला आहे त्यामुळे उसाचे पीक जोमात आहे. शेतकरी ऊस पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. पाण्याचा काटकसरीने वापर करत गेल्या वर्षभरात ठिबक सिंचनाद्वारे उसाचे पीक जोपासले आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी २५४ हेक्टर्स क्षेत्रावर आडसाली (जून-जुलै) उसाची लागवड केली. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान १४ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. पूर्वहंगामी (ऑक्टोबर-नोव्हेबर) १५ हजार २१९ हेक्टरवर लागवड तर तोडणी झालेला ३२ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावरील खोडवा ऊस असा ६३ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस या वर्षी गाळपासाठी उपलब्ध झाला आहे.
या वर्षी जिल्ह्यातील ५ सहकारी व ६ खाजगी साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. यात सहकारीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याने ५ लाख ८ हजार २४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख ३५ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा १०.५३ राहिला. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ९८ हजार ८९३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख २७ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ८.५७ असा आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याने ३ लाख ६१ हजार ९६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ६१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ९.९७ टक्के असा आहे. विलास २ तोंडार या साखर कारखान्याने ३ लाख ६१ हजार १० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख १३ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याने साखर उतारा ११.४६ असा आला आहे. संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याने १ लाख २३ हजार ६२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याने साखर उतारा १०.६६ असा आला आहे तसेच खाजगीमध्ये ट्वेंटीवन शुगरने ७ लाख २५ हजार ७०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ७० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा १०.६१ असा राहिला. सिध्दी शुगर लि. या साखर कारखान्याने ५ लाख २ हजार ४४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ८३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ९.६२ असा राहिला. जागृती शुगरने ५ लाख ६३ हजार १५० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख ५५ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ९.८७ राहिला.
पन्नगेश्वर शुगरने १ लाख २३ हजार ४७० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ५ हजार ४५० क्विंटल साखेरचे उत्पादन केले तर साखर उतारा ८.५४ असा राहिला. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याने ८३ हजार ७४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७५ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ९.०५ राहिला आहे. श्री साईबाबा शुगर लि. या साखर कारखान्याने ६५ हजार २३७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५५ हजार ३९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर साखर उतारा ८.४९ राहिला आहे.