सिल्लोड : शेतमालाला भाव नाही, खतं खरेदी करताना जात टाकावी लागणं अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या राज्यातला शेतकरी सामोरा जातो आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतक-यांन मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे.
सत्तार म्हणाले, नाफेडची सध्या ४० केंद्र सुरू आहेत. कांद्याला सध्या नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.
रासायनिक खतं खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये शेतक-यांना जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही. हा मुद्दा काल अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. त्यावरुन चर्चाही झाली. आपण याबद्दल केंद्र सरकारला कळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
याच मुद्यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, खत खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल.
शेतक-यांची माफी मागताना सत्तार म्हणाले, ‘शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतक-यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल.’