May 19, 2022

४१९ आयटीआय कॉलेजचा कायापालट!

Read Time:5 Minute, 22 Second

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा कायापालट करण्याचा शासनाचा मानस असून, त्यादृष्टीने राज्य शासनाने हालचालीही सुरू केल्या आहेत. राज्यातील जवळपास ४१९ शासकीय आयटीआय प्रशिक्षण संस्थांना आता नवे रुप दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या संस्थांमध्ये तीन कृषिविषयक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याबाबतचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामुळे भविष्यात आयटीआयचे चित्र बदललेले पाहायला मिळणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी व सहयोगी उद्योजक यांच्या सहकार्यातून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या माध्यमातून ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करणे व सहा उच्च श्रेणी केंद्रे आणि तीन कृषिविषयक सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच यासंबंधीच्या बैठकीचे फोटो शेअर करून माहिती दिली आहे. या बैठकीला खुद्द शरद पवारही उपस्थित होते. याशिवाय राज्याचे रोजगार व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित होते.

राज्यात रोजगार वृद्धी व कुशल मनुष्यबळ विकसित करण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत यासंबंधीची चर्चा करण्यात आली. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीसह सहयोगी कंपन्यांच्या मदतीने राज्यातील आयटीआयला नवे रूप दिले जाणार आहे. एक काळ असा होता की, आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. मात्र, अलिकडे राज्यातील आयटीआय ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत आयटीआयला नवे अभ्यासक्र म जोडून उर्जितावस्था देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात आयटीआयचा कायापालट पाहायला मिळणार आहे. काळाची पावले ओळखून नव तरुणाईच्या करिअरला पूरक अभ्यासक्रम जोडल्यास नव्या पिढीचा आयटीआयकडे पुन्हा ओढा निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली सहकार्याची ग्वाही
आयटीआयमध्ये काळाशी सुसंगत आणि नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अगोदरच सांगितले होते. त्यामुळे कौशल्य विकास विभाग आणि विविध कार्पोरेटस् यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

५३ टेक्निकल स्कूलचे करणार आधुनिकीकरण
राज्य सरकारने नव्या पिढीला रोजगाराच्या सक्षम संधी उपलब्ध व्हाव्यात आणि उद्योगालाही चालना मिळावी, या दृष्टीने तांत्रिक शिक्षणातही बदल करण्याचे ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून आयटीआयसोबतच ५३ टेक्निकल स्कूलचे आधुनिकीकरण करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे येणा-या काळात टेक्निकल स्कूलमध्येही कायापालट झालेला दिसेल.

टाटांचा पुढाकार
औद्योगिक क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने टाटांचा नेहमीच पुढाकार असतो. औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणा-या आयटीआयचा कायापालट करण्यासाठी टाटा टेक्नॉलाजीची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे या माध्यमातून बदलत्या परिस्थितीत आवश्यक ते बदल होऊ शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − four =

Close