
३७ लाखाचा गुटखा नांदेडात जप्त
नांदेड : कर्नाटक राज्यातून नांदेडला गुटखा घेऊन येणारा ट्रक नांदेड ग्रामिण पोलिसांनी पकडला. यावेळी या ट्रकमध्ये विनापरवानगी बंदी असलेला ३७लाखाचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषध विभागाच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. एक) सकाळी करण्यात आली.
नांदेड ग्रामिण पोलिसांचे एक पथक आपल्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी बोंढार बायपास रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक (केए३९-८०२७) ला थांबविले. ट्रकचालकास ताब्यात घेऊन ट्रकमध्ये काय आहे असे विचारताच चालकाची बोबडी वळली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ३६ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा गोवा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी पाच लाखाच्या ट्रकसह ४१ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन रौफ इनामदार याला ताब्यात घेतले.
स्थागुशाचे पोलिस निरीक्ष द्वारकादास चिखलीकर, ग्रामीणचे अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ट्रक बोंढार बायपास मार्गावर ही कारवाई केली. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी रौफ इनामदारव त्याच्या एका साथिदाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.