३६ धरणे १०० टक्के भरली

Read Time:3 Minute, 26 Second

मुंबई : गुलाब चक्रीवादळाने राज्यात थैमान घातले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळप्रवण भागात दिसून आला. उभी पिके नष्ट झाली आहेत. मात्र, दुस-या बाजूला मुसळधार पावसामुळे राज्यातील ३६ हून अधिक धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, पावसाने थैमान घातल्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पिके पाण्याखाली गेली असून, शेतक-यांची प्रचंड हानी झाली. हातातोंडाला आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची मागणी केली जात असून, भरीव मदत दिली जावी, असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरणांतील पाणीसाठा १०० टक्क्यांवर जाण्याची गेल्या कित्येक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ३ हजार २६७ धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. धरणांमधील पाणीसाठ्यामुळे येत्या उन्हाळ््यातील पाण्याची समस्या जरी सुटली असली, तरी गुलाब चक्रीवादळामुळे पिकांसह मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रावर एकानंतर एक चक्रीवादळाची संकटे येतच आहेत. आधी निसर्ग, मग तौत्के आणि आता गुलाब चक्रीवादळ. आम्ही अजूनही निसर्ग आणि तौत्के वादळाने झालेल्या हानीची नुकसान भरपाई देत आहोत आणि आता विदर्भ-मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आम्हाला असे वाटते की, केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या राज्यातील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करून राज्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

विभागनिहाय पाणीसाठा
कोकण विभाग ९५.०५ टक्के, अमरावती ८५.०३ टक्के, औरंगाबाद विभाग ७६.१२ टक्के, नागपूर विभाग ७८.१८ टक्के, नाशिक ८०.४३ टक्के, पुणे ८७.७५ टक्के असा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तसेच मराठवाड्यातील धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − six =