
२५ हजारांची लाच घेताना सहायक निबंधकास रंगेहात पकडले
पूर्णा : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधातील तक्रारीत मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील सहाय्यक निबंधक रवींद्र रमेशराव सावंत (वय ३९) यांना गुरूवारी, दि.१७ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले. येथील सहायक निबंधक सावंत हे पूर्णा येथे वर्ग २चे अधिकारी आहेत. संबंधित लाच प्रकरणात तक्रारदार याने त्याचा भाऊ चेअरमन असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रार निरसनासाठी व सुनावणी दरम्यान मदत करून निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी या लोकसेवकाने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने या लोकसेवका विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १७ जून रोजी दुपारी २.३० वाजता पूर्णा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये पंचासमक्ष लोकसेवक रवींद्र सावंत यांनी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी भारत हुंबे, पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंते, अनिल कटारे, शेख मुख्तार, माणिक चाटे यांनी घटनास्थळीच सावंत याला लाच घेताना ताब्यात घेतले.
तसेच पूर्णा पोलीस स्थानकात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून सावंत याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नांदेड विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक अर्चना पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.