
१८ वर्षांवरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण, लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे गती वाढवणार
मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सुमारे सहा कोटी लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्राने राज्यावर टाकली आहे. त्यासाठी मिळेल तेथून लस घेण्याची तयारी आपण केली आहे. परंतु लस उपलब्ध व्हायला वेळ लागेल. केंद्र सरकार संपूर्ण मे महिन्यासाठी केवळ १८ लाख लसी उपलब्ध करून देणार असल्याने अडचण आहे. तरीही १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. कोविन अँपवर नोंदणी करूनच केंद्रावर यावे, उगाच गर्दी करू नका, सर्वांना लस मिळेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून आत्तासारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्याची आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ४५ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणात अडथळे येत आहेत. असे असताना केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांनाही लस देण्याची घोषणा केली असून याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. राज्य सरकारने या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने १ मे पासून हा टप्पा सुरू करणे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमातून लोकांशी संवाद साधताना उद्यापासूनच या वयोगटातील लोकांचेही लसीकरण सुरू होईल अशी घोषणा केली. उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नव्हे. त्यामुळे तरुणांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. लसीकरण केंद्र कोविड प्रसार मंडळ होणार नाही याची काळजी घ्या, तेथे गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
रोख पैसे देऊन १२ कोटी डोस घेण्याची तयारी
राज्यातील १ कोटी ५८ लाख लोकांचे लसीकरण आतापर्यंत करण्यात आले आहे. १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी लोकांसाठी राज्याला लसीच्या १२ कोटी डोसची आवश्यकता आहे व एकरकमी पैसे देऊन ते खरेदी करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. १० लाख लोकांना लस देण्याची आपली क्षमता आहे. परंतु तेवढी उपलब्धता नाही. जून-जुलै पर्यंत पुरवठा वाढेल. मात्र तोपर्यंत आहे त्या गर्दी न करता कोविन अँप वर नोंदणी करून व वेळ घेऊनच लसीकरणासाठी जावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यांसाठी स्वतंत्र अँप तयार करण्याची विनंतीही आपण पंतप्रधानांना केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
….तर रुग्णसंख्या १० लाखांवर गेली असती.
लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची आपली इच्छा नव्हती. परंतु संसर्ग वाढत चालल्याने निर्णय घ्यावा लागला. निर्बंध घातले नसते तर आज राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखापर्यंत वाढली असती व आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असती. अजूनही संसर्ग कमी झालेला नाही. पण तो नियंत्रणात आहे. आज संपूर्ण देश ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. हायकोर्टाने संपूर्ण लॉकडाऊन का करत नाही असे विचारले होते. पण लोक सामंजस्याने व जबाबदारीने वागत असल्याने तशी आवश्यकता वाटत नाही. लॉकडाऊनमुळे रोजी मंदावली असली तरी आपण रोटी थांबू देणार नाही. गरीब व श्रमिकांना मदत देण्यात येत आहे. मोफत शिवभोजन योजनाही पुढील दोन महिने सुरू राहील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
तिसऱ्या लाटेची तयारी
गेल्या वर्षभरात आरोग्य व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तरीही दुसऱ्या लाटेचा अपेक्षेपेक्षा अधिक तडाखा बसल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाला. मात्र मिळेल तेथून याची उपलब्धता करून देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. काही महिन्यांनी तिसरी लाट येण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. ती थोपवण्यासाठी प्रयत्न करतानाच त्याला तोंड देण्यासाठी सर्व सज्जता ठेवण्याचेही प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात २७५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आपल्या खर्चाने उभारतो आहोत. येणाऱ्या पावसाळ्याचा विचार करून कोविड सेंटर्सचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लग्नसमारंभ साधेपणाने करा
येणाऱ्या महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेऊन लोकांनी सरकारने ठरवून दिलेल्या निर्बंधांचा आधीन राहून लग्न समारंभ पार पडावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.