
१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरण सुरू, पहिल्या दिवशी साडे अकरा हजार तरुणांना लस
मुंबई, दि.१(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात आजपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी २६ जिल्हयात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ११ हजार ४९२ तरुणांचे लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.[woo_product_slider id=”480″]
आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेत गर्दी होऊन अडचण निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने ठराविक लसीकरण केंद्रांवरच १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्यातील १३२ केंद्रांवर ही व्यवस्था करण्यात आली होती. कोविन अँपवर नोंदणी करून व वेळ निर्धारित करूनच लसीकरणासाठी केंद्रावर येणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने व स्वतः मुख्यमंत्र्यांनी कालच हे स्पष्ट केले होते. परंतु तरीही आज अनेक ठिकाणी केवळ नोंदणी करून वेळ निर्धारित न करता किंवा नोंदणीही न करता लोकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. त्यातच लसींची पुरेशी उपलब्धता नसल्याने ४५ वर्षांवरील लोकांनाही परतावे लागले.