January 22, 2022

१५-२० दिवसांत कोरोना संक्रमणाचा उद्रेक !

Read Time:5 Minute, 53 Second

देशभरासह राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८१ हजार ४६६ नवे कोरोना रुग्ण वाढले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. आता कोरोनाच्या प्रसाराबाबत आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. देशात येत्या १५ ते २० दिवसांत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणे नोंदवली आहेत यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झाले आहे.

मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १५-२० दिवसांत रोज ८० हजार ते ९० हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या ६ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आता चिंता वाढविणारी आकडेवारी समोर आली आहे.

एकीकडे देशात रोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील आकडेवारी सर्वांत पुढे आहे. तसेच मुंबईतही रुग्णांचा रोज नवा विक्रम होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह सामान्य मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली असून, संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. शहर, उपनगरांत गुरुवारी साडेआठ हजार रुग्णांची भर पडली होती, तर १८ वर बळी गेले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, येथे झोपडपट्टया व चाळीच्या वस्तीत सक्रीय कंटेन्मेंट झोन्स ८० असून, सक्रीय सीलबंद इमारतीची संख्या ६५० आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

देशात ८१ हजार नवे रुग्ण
देशात रुग्णसंख्येने गेल्या महिन्यातील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत ८१ हजार ४६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी २३ लाख, ३,१३१ वर पोहोचली आहे. तसेच मृतांचा आकडा १ लाख ६३ हजार ३६९ वर पोहोचला आहे, तर सक्रीय रुग्णांची संख्या ६ लाख १४ हजार ६९९ आहे, तर १ कोटी १५ लाख, २५ हजार ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्र लसीकरणात अव्वल
राज्य शासनाने लसीकरणाच्या मोहिमेला दिलेल्या व्यापक स्वरुपामुळे लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्राने राजस्थानलाही मागे टाकले. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४५ हजार ८६० लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले, तर राजस्थानात ५५ लाख ८२ हजार ८७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राजस्थानानंतर गुजरातमध्ये ५४ लाखांवर, उत्तर प्रदेशात ५३ लाखांवर, पश्चिम बंगालमध्ये ५० हजारांवर लसीकरण झाले.

राज्यात ४७ हजार नव्या रुग्णांची भर
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २०२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज २४ हजार १२६ रूग्ण कोरोनातून बरेदेखील झाले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − three =

Close