१५ जूनपर्यंत निर्बंध कायम

Read Time:5 Minute, 11 Second

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत असले, तरीदेखील अद्यापही रोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस म्हणजे १५ जूनपर्यंत नाईलाजाने निर्बंध लावावे लागणार आहेत. मात्र, रुग्णांची स्थिती पाहून काही जिल्ह्यात कडक तर काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जनतेवर निर्बंध लादावे लागतात, या सारखे दुसरे कटू काम नाही. पण ते मला नाईलाजाने करावे लागत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. पुढील काळात राज्यात काय निर्णय होणार, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिद्दीने आणि निश्चयाने बंधने पाळल्याबद्दल जनतेला धन्यवाद देत त्यांचे आभारही मानले. याचबरोबर आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही, असेही ते म्हणाले.

आज राज्यात १८ हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळून आले. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होत आहे. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. शहरी भागात हे प्रमाण कमी होताना दिसत असले तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. याचा विचार करून आणखी १५ दिवस राज्यात कडक निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गावे कोरोनामुक्त व्हावीत
शहरांमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, गावा-गावांमध्ये थोडे का असेनात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दुस-या लाटेत ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाव कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. मग तालुका, जिल्हा कोरोनामुक्त झाला, तर राज्य कोरोनामुक्त होईल. त्यामुळे सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लसीकरणाचा वेग वाढविणार
४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतली आहे, तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण २४ तास लसीकरण करू. मात्र, अजूनही लसीची उत्पादन क्षमता तेवढी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले जात आहे. तसे झाल्यास लसींचा वेग वाढविला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तिस-या लाटेला आमंत्रण नको
कोरोना संकटाच्या काळात मोर्चे, समारंभ टाळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दुकाने उघडा किंवा सेवा सुरू करा, यासाठी रस्त्यावर उतरु नका. कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा. करोनाची लाट ही सरकारी योजना नाही. तिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावर उतरत आहे. हा गैरसमज मनातून काढून टाका. रस्त्यावर उतरू नका, तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 9 =