August 19, 2022

१२ हजार भारतीय कीव्हमधून बाहेर

Read Time:4 Minute, 14 Second

नवी दिल्ली : युक्रेनची राजधानी कीव्हमधून १२ हजार भारतीयांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून भारतीयांना मायदेशात आणण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.

युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बचाव मोहिमेत भारतीय हवाई दलाचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑपरेशन गंगा मोहिमेला वेग आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांत पाठविण्यात आले आहेत.

कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा बॉम्बच्या हल्ल्यात मृत्यू
युक्रेनमधील खार्कीव्ह शहरात रशियाने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नवीन शेखरप्पा (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी भारतीय विद्यार्थी किराणा आणण्यासाठी बाहेर पडला. त्यावेळी रशियन सैनिकांच्या हल्ल्यात त्याचा नाहक बळी गेला. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नवीन शेखरप्पाच्या घरी फोन केला आणि त्याच्या वडिलांशी बोलत शोक व्यक्त केला.

खार्कीव्हमध्ये ३ हजार भारतीय विद्यार्थी अडकले
खार्कीव्हमध्ये हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या बातमीने भारताची चिंता वाढली आहे. कारण अजूनही ३ हजार भारतीय विद्यार्थी खार्कीव्हमध्ये अडकले आहेत. त्यातच रशियाचे हल्ले वाढल्याने येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून थांबावे लागत आहे.

खार्कीव्हमधील भारतीयांना बाहेर काढण्याचे आव्हान
खार्कीव्ह रशियन सीमेपासून अवघ्या ४० किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे. कारण येथून १५०० किमी दूर रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहोचणे भारतीय विद्यार्थ्यांना पोहोचणे सोपे नाही.

मोदींची फ्रान्सच्या राष्ट्रपतींशी चर्चा
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यासोबतच युरोपीयन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशीही बातचित केली. यावेळी भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − eight =

Close