January 22, 2022

१२ वीच्या परीक्षा होणारच!

Read Time:6 Minute, 24 Second

नवी दिल्ली : इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही, तर २५ मेपर्यंत सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले आहे, असे सांगण्यात आले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार १२ वीची परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तथापि, परीक्षेची तारीख आणि परीक्षा पद्धती यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंबंधी १ जून रोजी घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पॅटर्न बदलू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यांतील परीक्षांचा निर्णय त्या-त्या बोर्डावर सोडला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याबाबत रमेश पोखरियाल म्हणाले की, बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अन्य राज्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. कारण आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण सल्ले मिळाले. मी राज्य सरकारांना २५ मेपर्यंत आपल्या विस्तृत सूचना पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे आम्ही इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एका निर्णयापर्यंत पोहोचण्यात सक्षम होवू आणि विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना आपल्या निर्णयाबाबत लवकरच सूचित करू. विद्यार्थी व शिक्षक दोघांचीही सुरक्षा आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.

कोरोनाची दुसरी लाट चालू असताना लांबणीवर टाकण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांबाबत आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा यात सहभाग होता. पोखरियाल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतरांकडून समाजमाध्यमातून त्यांचे म्हणणे मागवले होते. यावेळी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमचे विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य असेल. त्याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज प्रतिपादित केली.

केंद्राचे राज्यांना २ पर्याय
बैठकीदरम्यान केंद्र सरकारने राज्यांना २ पर्याय दिले. त्यातील पहिल्या पर्यायानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांना काही निवडक विषयांची परीक्षा द्यावी लागेल आणि त्यातील गुणांनुसार अन्य विषयाचे गुण दिले जातील, तर दुसरा पर्याय परीक्षा पॅटर्न बदलण्याचा. त्यात ३ तासांच्या परीक्षेऐवजी १.५ तासाचा पेपर होईल, त्यात बहुपर्यायी प्रश्न असतील, असे सांगण्यात आले. परंतु ब-याच राज्यांनी या दोन्ही पर्यायांना विरोध केला. काही राज्यांनी तर परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली.

२५ तारखेपर्यंत मागवल्या सूचना
बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्यांनी मोलाचा आणि व्यापक अर्थाने सल्ला द्यावा. त्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना २५ मेपर्यंतची मुदत दिली आहे. आजची बैठक सकारात्मक झाली आणि राज्यांनीही ब-याच सूचना केल्या, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

३ विषयांची परीक्षा घेण्यावर विचार
बारावीतील प्रमुख विषय म्हणजेच मेजर सब्जेक्ट्सची परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे. १२ वीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्टसच्या केवळ ३ मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यावर विचार सुरू आहे. इतर विषयांना प्रमुख विषयांमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारावर मार्किंगचा फॉर्म्युलाही ठरवला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्याच्या बोर्डांना अधिकार
बारावीची परीक्षा घेण्यात येणार असून, त्याबाबत २५ मेपर्यंत राज्यांना सविस्तर सूचना देण्यास सांगितले असले, तरी राज्यांमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यांच्या बोर्डांनाच अधिकार असतील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

३० मे रोजी पुन्हा बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाईल. त्यानंतर ३० मे रोजी पुन्हा एकदा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्र सरकार परीक्षेबाबत आपला निर्णय जाहीर करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − eight =

Close