।। मानसहोळी ।। संत जनाबाई यांची!

Read Time:9 Minute, 54 Second

।। मानसहोळी ।। संत जनाबाई यांची!

कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ।।

ऐसे ते स्थान । साधने सारावले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।। 🙏🙏🙏
अभंगाचा भाव:
संपूर्ण जगात होलीकेचा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत होलिकेच्या सणाला समर्पण, प्रेम, रंगात रंगणे, हेवेदावे दुर करण्याची संधी, दुर्गुण, दुराचार, कालबाह्य वस्तू,अडगळीतील सामान इत्यादी चांगल्या संकल्पना जनमानसात रूजविणे आणि वाईट संकल्पना नष्ट करण्याचे प्रतिक म्हणून आधुनिक काळात बुध्दिवादी लोक आजही हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येतो. पण या सणाला ऐतिहासिक महत्त्व व बैठक आहे.भगवंताच्या अवतार कार्यापुर्वी पृथू राजाच्या नगरीत ” ढुंढूं” नावाची कुटल राक्षसीन लहान मुलगा जन्मला की त्याला जाळून नष्ट करायची. या राक्षसीनी पासून लहान मुलांना सांभाळताना लोकांचे नाकी नऊ यायचे. अनेक जपतप करून देवतांचही काही चालत नव्हतं एक घडी पृथू च्या राजधानीत, हिवाळ्यात सर्दीवर मात करण्यासाठी नागरिकांनी लाकडे जमा करून मोठा आग्निढोंब केला. याप्रसंगी सगळेच नागरिकांकडून आनंद व्यक्त करताना मोठ मोठ्या आवाजात हसू खेळू लागले. बोंबाबोंब करून एकमेकाच्या अंगावर, चिखल फेक करून नगारे वाजवत होते. या गदारोळात ढुंढुं राक्षसीन आली. त्यावेळी राक्षसीन आल्याची चाहूल लागताच बोंबाबोंब करून सगळेच एक झाले त्या राक्षसीनला सर्वांनीच घेरलं व लाठ्याकाठ्या, चिखल फेक करून तीला जेरीस आणल घेरावबंदी करून चालू असलेल्या आग्निढोंब वनव्यात घातलं व राक्षसीन जाळून टाकली. मग दरवर्षीच नष्ट करण्याचे प्रतिक म्हणून होळी उत्सव साजरा करीत असंत .शिव पार्वतीचे प्रेम अबाधित ठेवण्याकरीता अशाच अग्निडोंबात कामाला जाळून टाकून त्याचेही प्रतिक म्हणून आधुनिक काळात होलिका उत्सव साजरा करण्यात येतो. भक्त प्रल्हाद यांना जाळून नष्ट करण्यासाठी , आगीत न जळण्याचे वरदान असलेली हिरण्यकश्पुची बहिण होलिका ही, भक्त प्रल्हादाला घेऊन अग्निकुंडात जाऊन बसली व अयोग्य कामामुळेच वरदान संपले व होलिका जळून खाक्क झाली.भक्त प्रल्हाद वाचले म्हणून होलिका सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण आवतारात ऐतिहासिक वारसा आणि प्रेम, मैत्रीवृध्दी होण्यासाठी तसेच गोकूळ व नंदगाॅव यांच्यातील लाठीमार होळीचे प्रतिक म्हणून आधुनिक काळात होलिका उत्सव साजरा करण्यात येत असतो.अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कारणावरून प्रेम, मैत्री, चांगल्या गुणांची जपवणूक वारसा परंपरा तसेच वाईट कृत्य, व्देष, व्दैत, वासना ईत्यादीचे उच्चाटन, वैराग्याचे जतन करण्याचे प्रतिक म्हणून आजही संपूर्ण जगात होलिका व महाराष्ट्र प्रांतात होळी सण अतिउत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत सर्वच संतांच्या अवतार कार्यात जगतकल्याणार्थ संतांच्या आचरसंहितेनुसार संत एकनाथ महाराजांचे निर्देश, जया परमार्थाची (कल्याणाची) चाड / तेणे सांडावे लिगाड/ अर्थात ज्याला स्वकल्याणाची इच्छा असेल त्याने वाईट गोष्टींचा त्याग करून भजनाची वाट धरावी. अनात्म पदार्थांचा त्याग हेच सर्व संतांचे शास्त्रोक्त मानस होते. याच भूमिकेतून अंगभूत त्याग व वैराग्य मुर्तीमंत पुतळा संत जनाबाई म्हणतात, वैराग्य व त्याग करून सर्वमान्य होळी मला साजरी करावयाची आहे.त्या करीता अंतःकरणातील मनाचे स्थान निवडले आहे.हे स्थान सरळ व स्थीर करणे अत्यंत अवघड आहे. या स्थानाने भल्याभल्यांना पाणी पाजून देशोधडीला लावलं आहे परंतू हे स्थान आपल्या नियंत्रणात आलं की सर्व जिंकलं. या स्थानाच्या पुढे कोणीही वाकड्या नजरेने बघत नाही काळही गुलाम होतो.म्हणून होळी सण साजरा करण्यासाठी भक्तीचे पाणी सिंपन करून या स्थानाची निवड करण्यात आली.संत जनाबाई म्हणतात, होळीचा सण साजरा करताना काय केले बघा, प्रथम मनाला तयार करून मनामध्ये कशाच समर्पण करावयाचे आहे.तेव्हढ पक्क करून समर्पणाचा , पुन्हा हालू नये म्हणून मोठा खोल खड्डा तयार करून त्यात एरंडाचे झाड, पोकळ अंहकाराचे प्रतिक म्हणून रोऊन घट्ट केले. अंहकार समर्पणाजोगा झाल्याची खात्री करून सर्व अनात्म पदार्थांची होळी करण्यासाठी अंहकाराभोवती लाकडे रूपी वासना, गोवऱ्यारूपी सर्वच इंद्रिय घट्ट बांधून ठेवले. मनाच्या संघटनेत अंहकार, वासना, इंद्रिय बांधून झाल्यानंतर मी आता निश्चिंत व अनात्म पदार्थापासून मोकळी झाले. देवकृपा झाली. तुकोबारायांचा अनुभव, आता कोठे धावे मन / तुमचे चरण देखिलीया/ भाग गेला शीण गेला/ अवघा झाला आनंद/ किंवा आता निश्चिंतिने पावलो विसावा / खुंटलिया धावा तृष्णेचिया. रामनामाच मंथन करून गुरूकृपेच तेलरूपी ज्वलंत द्रव्य समर्पण भाव अर्पण केला. होळीच्या भोवती सत्कर्माची रांगोळी रेखाटली. सर्व इंद्रियासह वैराग्याचा भाव प्रकट करून वैराग्य अग्नीने प्रज्वलित करून सर्व विषयाचे पक्वान्न नैवद्य व षड्रिपू श्रीफळ वाहून या सर्वांहून पाणी फिरविले व पुन्हा या विषयी अंहते ममतेचा भाव निर्माण होईल म्हणून बोंब ठोकली. आता अंहकार, अंहता ममता सर्व समर्पित झाली. आता काहीच शिल्लक राहिलाच मी निसंग झाले.सर्वार्थाने माझा होळीचा सण साजरा होऊन मी केवळ वाळ्या सारखी दिसायला लागले. कल्पित जनी देवस्वरूपाच्या रंगात मुक्तीचा आनंद लुटत आहे.ज्ञानोत्तर भक्तीचा परिपाक म्हणजेच, आता दिवस चारी खेळीमेळी या भूमिकेतून जनाबाई महाराज म्हणतात,भगवंता मी सतत या रंगात रंगून व अखंड आनंदाच्या दिवाळीत रममान असते.
रामकृष्णहरि, मी ही ह्या अभंगाचा भाव प्रकट करताना, संत जनाबाई महाराजांच्या रंगात आजचा रंगपंचमीचा दिवस घातला खूप समाधान व आनंद वाटला. आमच्या जीवनात असाच होळीचा सण साजरा व्हावा ही संत जनाबाई महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत.
रामकृष्णहरि.
डाॅ.अनंत पांडुरंग जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =