July 1, 2022

हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद महागणार!

Read Time:4 Minute, 0 Second

नवी दिल्ली : कोरोना आणि त्यामुळे आलेली टाळेबंदी याचा फटका सर्व स्तरातील लोकांना बसला. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागल्याने या व्यावसायिकांचेही फार मोठे नुकसान झाले. गेल्या दीड वर्षात राज्यात अनेक महिने बहुतांश ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट सेवा बंद राहिली, जी सुरू होती तीदेखील रडतखडत सुरू होती. त्यातच वीजबिल, जागेचे भाडे, कर्मचा-यांचा पगार यामुळे या हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांचे पेकाट मोडले. त्यातच वरून महागाईची झळ वाढली. त्यामुळे हॉटेलमधील खाद्य पदार्थांचे दर वाढविण्याचे संकेत हॉटेल व्यावसायिक संघटनेने दिले आहेत. यामध्ये सरासरी २० टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

कोरोनाची झळ हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणात बसली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यात हॉटेल-रेस्टॉरंटही बंद ठेवण्यात आले होते. त्यात काही दिवस पार्सल सेवेची मुभा दिली. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यात वरून हॉटेलचे भाडे, लाईट बिल आणि कर्मचा-यांच्या पगाराचा भुर्दंडही मालकांना सहन करावा लागला. कारण हॉटेलमधील कर्मचारी सोडून गेल्यास कोणाच्या जिवावर हा व्यवसाय करायचा, याची चिंता मालकांना भेडसावत होती. त्यामुळे हॉटेल मालकांना कर्मचा-यांना सांभाळून ठेवावे लागले. यातून हॉटेल मालकांना फार मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

त्यातच पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने या महागाईचा परिणाम वस्तूंवरही झाला असून, खाद्य पदार्थांचेही दर वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे आहारचे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी म्हटले आहे त्यामुळे आगामी काळात हॉटेलिंगसाठी ग्राहकांना ज्यादा पैसे मोजावे लागू शकतात.

दरवर्षी साधारण जून महिन्यात हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होते. गेली दोन वर्षे ही वाढ झालीच नाही, तर दुसरीकडे सर्वसमान्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. तेव्हा दरवाढ करताना याचाही विचार केला जाईल, असे मत ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केले. एकूणच महागाईच्या झळा सर्वच क्षेत्रांना बसत आहेत. त्यात हॉटेल व्यवसायही सुटलेला नाही. त्यामुळे आता यापुढे हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे हॉटेल-रेस्टॉरंटशी संबंधित संघटना ‘आहार’ने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − 16 =

Close