January 22, 2022

हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र हाल | सकाळी झुंबड; दुपारनंतर शुकशुकाट

Read Time:5 Minute, 24 Second

हातावर पोट असणाऱ्यांचे हाल 
दररोज काम करून कुटुंबाचा प्रपंच चालविणारे किरोकोळ विक्रेते, मजूर, दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मात्र लॉकडाउनमुळे हाल सुरू झाले आहे. प्रतिष्ठाणे बंद असल्याने मालकांनी मजुरांना बिनपगारी सुटी दिली आहे. किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने तेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड केली. दुपारी १२ वाजेनंतर मात्र शहरातील रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. सकाळी कुठेही कोविड नियमांचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्हा लॉकडाउन करण्याचे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता.२५) सुरु झाली आहे. सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, किराणा, दूध विक्री सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.

काही ठिकाणी बिगर आवश्यक दुकानेही सुरू केल्याचे आढळून आले. शहरातील सर्व परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या अनेक दुकानांवर ग्राहकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर भाजीची विक्री सुरू होती. सकाळी १० ते दुपारी १२ नंतर मात्र दुकाने बंद झाली. काही दुकानदारांनी ही वेळ पाळली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरात गाडी फिरवून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याची व नागरिकांना रस्त्यावर न फिरण्यासंदर्भात सूचना दिली जात होती  
पोलिसांची तारांबळ 
बुधवारी दुपारी पोलिसांनी गस्त घालून बाजारपेठेसह गल्ली बोळांतील जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने सुरू नाहीत ना याची पाहणी केली. भाजीपाला, फळ विक्रेते व मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनांना बंदचे आवाहन पोलिस करताना दिसून आले. दरम्यान पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत परिस्थिती सांभाळण्यात पोलिस परिश्रम घेताना दिसून आले. 

मनपा प्रशासनाची हातावर घडी 
एकीकडे टाळेबंदीची अंमलबजावणी करून घेताना पोलिसांची तारांबळ उडत असताना मनपा क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका प्रशासन गांभिर्याने उपाययोजना करताना दिसले नाही. मनपाचे कर्मचारी बाजारात कुठेही आढळून आले नाहीत. अतिक्रमण निर्मुलन पथकाने रस्त्यावर गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांना गाड्या लावण्यास मनाई केली. हे पथक वगळता मनपाचे कर्मचारी कुठेही फिरताना दिसून आले नाही.

व्यापाऱ्यांमध्ये नाराजी 
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी भाजी बाजारात, किराणा दुकाने व पेट्रोलपंपावर नागरिक गर्दी करताना दिसून आले. या गर्दीने कोरोना पसरत नाही आणि प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून इतर बिगर जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांमुळे कोरोना पसरतो का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि आझाद समाज पार्टीनेही प्रशासनाकडून लॉकडाउनच्या नावाखाली होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

Close