January 22, 2022

कोरोना विषाणू हवेतून प्रसाराचे वास्तव

Read Time:13 Minute, 21 Second

कोरोना विषाणूच्या बाबतीत हाती आलेली नवीन माहिती अशी की, विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याची शक्यता बरीच वाढली आहे. ‘द लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित एका वृत्तांतात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची दहा कारणे देण्यात आली आहेत. कोविड-१९ चा प्रसार शिंकल्यामुळे एखाद्याच्या नाकातून बाहेर पडणा-या शिंतोड्यांच्या (ड्रॉपलेट्स) माध्यमातून होण्याबरोबरच हवेच्या कणांमधून म्हणजेच एअरोसोलच्या माध्यमातून होत आहे, यावर या वृत्तांतात भर देण्यात आला आहे. क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात येत असलेल्या खोल्यांना लागून असलेल्या खोल्यांमध्ये राहणा-या लोकांना झालेल्या संसर्गातून याची पुष्टी झाली आहे. विशेष बाब अशी की, संसर्गाच्या विळख्यात सापडलेले लोक संसर्गग्रस्तांच्या खोलीत कधी गेलेच नव्हते.

या अध्ययनात ज्या संसर्गग्रस्त व्यक्तीला सामील करून घेण्यात आले होते, तो ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे दिसून आले आणि त्याच्यामुळे आणखी ५३ लोकांना संसर्ग झाला. यातील अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात कधीच आले नव्हते. म्हणजेच ते हवेत असलेल्या कोरोना विषाणूंमुळे संसर्गग्रस्त झाले असावेत, असे मानण्यात येते. ‘द लॅन्सेट’चा हा निष्कर्ष वस्तुत: एका समीक्षात्मक अहवालावर आधारित आहे. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडातील संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील त्रिश ग्रीनहाल या अहवालाच्या मुख्य लेखिका असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या ज्या उपायांमुळे आपण स्वत:ला सुरक्षित समजत होतो, ते उपाय हवेतून विषाणू पसरण्याच्या प्रक्रियेपुढे थिटे पडले आहेत. अर्थात, हवेतून विषाणू पसरत आहेत, याचा अर्थ हवा संक्रमित आहे, असा होत नाही. हवेत विषाणू बराच काळपर्यंत राहू शकतो, असा याचा अर्थ होतो. विशेषत: बंदिस्त खोल्या आणि इमारतींमधील हवेत तो अधिक काळ राहून धोका उत्पन्न करू शकतो. अशा स्थितीत रुग्णालयांमधील हवा अधिक संसर्गप्रवण ठरू शकते. रुग्णालयात आलेला एक संसर्गग्रस्त अनेकांना संसर्ग देऊ शकतो.

शिंकल्यावर किंवा खोकल्यावर तोंडातून उडणारे शिंतोडे काही काळ हवेत तरंगू शकतात, तेव्हा एअरोसोल तयार होतो. अर्थात, हे छोटे थेंब किंवा शिंतोडे हवेबरोबर फार दूर प्रवास करू शकत नाहीत आणि लवकरच ते नष्ट होतात, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु कोरोनाच्या बाबतीत असे घडत असल्याचे पुरावे मिळाले असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोरोना विषाणू हवेत पसरतो, असे पत्र ३२ देशांच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये डब्ल्यूएचओला म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेला लिहिले होते. अत्यंत छोट्या आकाराचे ड्रॉपलेट्स कधीही संसर्गग्रस्त करू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु एन्फ्लुएन्झाप्रमाणे हवेतून विषाणू पसरत असल्याचे पुरावे कोरोनाच्या बाबतीत अद्याप मिळाले नसल्याचे त्यावेळी डब्लूएचओने म्हटले होते. संघटनेच्या मते, हवेच्या माध्यमातून पसरणारे ड्रॉपलेट्स अगदी थोडा प्रवास करू शकतात आणि तेवढ्या छोट्या क्षेत्राच्या संपर्कात येणा-या व्यक्तीलाच संसर्गग्रस्त करू शकतात.

परंतु यावेळी ३२ देशांमधील २३९ शास्त्रज्ञांनी नवीन अध्ययनातून मिळालेले पुरावे अधोरेखित केले आहेत. विषाणूला वाहून नेणारे अतिसूक्ष्म आणि हवेत तरंगणारे कणही लोकांना संसर्गग्रस्त करू शकतात, याचे हे पुरावे आहेत. हे छोटे ड्रॉपलेट्स आणि कण हवेत बराच काळ राहू शकतात आणि श्वासांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तीला संसर्गग्रस्त करू शकतात. ज्या खोलीत संसर्गग्रस्त रुग्ण काही वेळासाठी येऊन गेला असेल, तर त्या खोलीत काही वेळासाठी हे कण आणि ड्रॉपलेट्स तरंगत राहू शकतात.

एकेकाळी इबोलासारख्या विषाणूबाबतही डब्ल्यूएचओची कोरोनासारखीच मते होती. इबोलासुद्धा एन्फ्लुएन्झासारखा हवेतून पसरतो, यावर संघटनेचा विश्वास नव्हता. चिंपाझी, गोरिला, जंगली हरीण यांसारख्या प्राण्यांच्या रक्ताच्या, स्त्रावाच्या किंवा विविध अवयवांतून पाझरणा-या द्रवांच्या संपर्कात आल्यास इबोला होतो असे संघटनेचे मत होते. परंतु २०२१ मध्ये ‘सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतात कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले की, संपर्कात न येताच इबोलाचा संसर्ग डुकरांमधून माकडांमध्ये पसरला होता. विषाणू हवेत पसरणे आणि तिथे कायम राहणे हे त्याचे कारण होते. इबोला विषाणूमुळे माणसांना आणि वानरांना व्हायरल हॅमरॅजिक फिवरचा आजार होतो आणि तो अत्यंत घातक ठरतो. इबोलाविषयी संशोधन करताना संसर्गग्रस्त वानरांना मकॉक वानरांसोबत एकाच ठिकाणी ठेवण्यात आले. माकडांचा कोणत्याही प्रकारे डुकरांशी निकट संपर्क येणार नाही, याची काळजी घेण्यात आली. परंतु आठ दिवसांत वानरांमध्ये इबोलाची लक्षणे दिसून आली.

म्हणजेच श्वसनप्रक्रियेद्वारे डुकरांनी सोडलेल्या हवेतून छोटे-छोटे शिंतोडे हवेच्या माध्यमातून वानरांच्या श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरात गेले आणि मग त्यांना इबोलाची लक्षणे दिसू लागली, असे मानले गेले. डॉ. गॅरी कॉबिंगर यांनी असे स्पष्ट केले की, हे शिंतोडे हवेत बराच काळपर्यंत मूळ स्वरूपात राहिले असले पाहिजेत, अशी शंका आहे. हे शिंतोडे काही वेळपर्यंत हवेत कायम राहू शकतात. हवेने या संसर्गित थेंबांना आपल्यात शोषून घेतले असावे आणि हवेच्या माध्यमातून संसर्ग सुरू झाला असावा, असे मानले गेले. डॉ गॅरी कॅबिंगर सांगतात की, केवळ आठ दिवसांत डुकरांपासून काहीशा दूर असलेल्या वानरांमध्ये संसर्ग पाहून त्यांच्या टीमला धक्का बसला होता.

संसर्गाच्या विज्ञानात दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १७ टक्के आजार संवाहकांद्वारे (व्हेक्टर्स) पसरतात. व्हेक्टर म्हणजे एक माध्यम असते. ते आजाराचे विषाणू, जीवाणू किंवा अन्य कारणे एका जिवाकडून दुस-या जिवाकडे वाहून नेते. डास, वटवाघूळ, पिसवा ही अशी माध्यमे म्हणजे व्हेक्टर्स होत. डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया, निपाह या आजारांचे विषाणू, इन्सेफेलायटिस, स्क्रब टाइफस, लेप्टोपायरोसिस, लाइम आणि कांगो ताप असे आजार माणसापर्यंत पोहोचविण्यात अशा प्रकारच्या कोणत्यातरी वाहकाचा सहभाग होता. कोरोना काळाच्या आधी दरवर्षी अशा संवाहकांकडून होणारे आजार सुमारे सात लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात असे मानले जात होते. हवेत एखाद्या संसर्गजन्य आजाराचे सूक्ष्मजीव मिळोत वा न मिळोत; परंतु कोणत्याही कारणामुळे जर हवा प्रदूषित झाली असेल, तर अशी हवाही कमी धोकादायक नसते.

अस्थमा, न्युमोनिया, ब्राँकायटिस, फुफ्फुसांचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पाल्मनरी डिसीज (सीओपीडी) अशा असंख्य आजारांचे कारण हवेचे प्रदूषण हेच असते. जगातील अन्य देशांमध्ये जी परिस्थिती असेल ती असो; परंतु भारतात दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा जीव प्रदूषित हवेत श्वास घेतल्यामुळे होतो, असे आकडेवारी सांगते. देशाच्या राजधानीची म्हणजे दिल्लीची स्थिती अशी आहे की, त्या हवेत एक दिवस श्वास घेणे म्हणजे सुमारे चार डझन सिगारेट ओढणे होय. दोन्हीमुळे होणारे शरीराचे नुकसान एकसारखेच असते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणारी व्यक्ती धूम्रपान कधीच करत नव्हती; परंतु दैनंदिन वायुप्रदूषणामुळे त्याला फुफ्फुसांचा कर्करोग झाला, अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

हवेतून कोरोनाचे विषाणू पसरत असल्यास एअर फिल्टर, चांगले व्हेन्टिलेशन, गर्दी कमी करणे, खुल्या हवेत कमी राहण्याचा सल्ला लोकांना देणे आदी उपाय योजून कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो. संवेदनशील ठिकाणी एकाच खोलीत राहण्याचा प्रसंग आलाच तर मास्क परिधान करणे आणि कार्यस्थळच असे असल्यास पीपीई किट परिधान करणे असे सल्ले दिले जातात. काही शास्त्रज्ञांच्या मते ‘दि लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांतामुळे फारसे घाबरून जाण्याची गरज नाही. हा आजार ड्रॉपलेट्समधून पसरतो हे संपूर्ण जगाला आधीपासून ठाऊक आहे. परंतु अशा परिस्थितीत लोकांनी कापडापासून तयार केलेले साधे मास्क न वापरता एन-९५ किंवा केएन-९५ प्रकारचे मास्क परिधान करणे गरजेचे आहे, असे या तज्ज्ञांचे मत आहे.

प्रत्येक व्यक्तीने एका मास्कचा वापर एकच दिवस करावा. वापर केल्यानंतर तो मास्क पेपर बॅगमध्ये बंदिस्त करून दुसरा मास्क वापरावा. दर २४ तासांनी अशा प्रकारे मास्क बदलावेत. तसेच आपले तापमान, पल्स रेट आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासत राहावे. घरातील एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किमान १४ दिवस त्या व्यक्तीपासून दूर राहावे, शक्य असल्यास अशा व्यक्तीचे बाथरूमही स्वतंत्र ठेवावे,
असे वेगवेगळे सल्ले देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − 2 =

Close