January 22, 2022

स्विस बँकेत वाढते धन

Read Time:5 Minute, 55 Second

काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा आपसूक स्विस बँकेचा उल्लेख होेतो. अर्थात स्विस बँकेत असणारा सर्वच पैसा हा काळा नाही.

या बँकेत अनेक औद्योगिक कंपन्यांची कायदेशीर खाती देखील आहेत. जगभरातील धनाढ्य व्यक्तींची या बँकेत खाती असून त्यात भारतीय नागरिकांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे स्वीस बँकेतील भारतीय खातेदारांच्या निधीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना काळात उत्पन्न कमी होत असताना भारतीयांच्या गंगाजळीत विक्रमी वाढ झाली असून ही वाढ तेरा वर्षांतील सर्वाधिक आहे. हे वाचून सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटू शकते. एकीकडे कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असताना श्रीमंतांची श्रीमंती मात्र वाढत गेली आहे.

स्विस बँकेत भारतीयांची संपत्ती २०,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेच्या मते, भारतीय खातेदारांची संपत्ती ही रोकड स्वरूपातून नसून ती सिक्युरिटी, विविध बाँड आणि अन्य प्रकारच्या आर्थिक स्रोतांमुळे वाढली आहे. परंतु या विश्लेषणातून स्विस बँकेत कोणत्या भारतीयांचा किती काळा पैसा जमा आहे, हे मात्र समजत नाही. एकुणात स्विस बँकेत भारतीय खातेदारांच्या पैशाची माहिती मात्र समजण्यास मदत मिळते. काळ्या पैशाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून राजकीय मुद्दा बनला आहे. २०१४ च्या निवडणुकीत काळ्या पैशावरच सर्व प्रचार केंद्रित होता. नेत्यांनी आपल्या प्रचारसभेत काळ्या पैशाबाबत मोठमोठे दावे केले. त्यावर अंकुश बसवण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली. देशातील नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

कालांतराने नोटाबंदीमुळे फारसा फायदा झाला नसल्याचे निष्पन्न झाले. याचा ठोस पुरावा म्हणजे निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोकड, मद्यसाठा आणि दागिन्यांची केलेली वसुली होय. एका अर्थाने नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्काच बसला आणि ही बाब कोणापासून लपून राहिलेली नाही. त्यानंतर काळा पैसा हा सरकारसाठी आकर्षक राहिला नाही आणि नागरिकांच्या मनातही त्याबाबत अप्रुप राहिले नाही. तरीही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालूच राहिले आणि ते चालूच ठेवावे लागणार आहेत. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. काळा पैसा हा पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि ही बाब धोकादायक आहे. भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटनसारख्या देशातही कोरोना काळात नागरिकांचे जीवन असे झाले. परंतु अब्जाधीशांच्या गंगाजळीत वाढ होत गेली.

अशावेळी स्विस बँकेत भारतीयांच्या मालमत्तेत बाँड, सिक्युरिटी आदी माध्यमातून वाढलेला पैसा हा समजू शकतो. परंतु ‘टॅक्स हेवन’ देशात असलेल्या बँकांत अब्जाधीशांचा मोठा पैसा दडलेला आहे. पनामा पेपर्स लीक हे प्रकरण त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. हे देश कोणत्याही प्रकारची आर्थिक माहितीची देवाणघेवाण अन्य देशांना करत नाहीत. म्हणूनच करचुकवेगिरी, काळा पैसा याचे मार्ग कसे बंद करावेत, ही बाब दीर्घकाळापासून आव्हानात्मक राहिली. अर्थात कूटनीतीच्या मार्गानेच वादग्रस्त खातेदारांपर्यंत पोचता येणे शक्य आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या काळात चांगली नाही. आगामी काळात आर्थिक शिस्तीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच प्रत्येक पातळीवर आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. तसेच परदेशातील बँकांत काळा पैसा ठेवणा-यांवरही कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. स्विस बँकेत भारतीय धनाढ्यांच्या संपत्तीत वाढ झाली असली तरी देशाच्या तिजोरीत किती काळा पैसा परत आला, हे जाणून घेण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.

शैलेश धारकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 15 =

Close