August 19, 2022

स्वारातीम विद्यापीठाच्या विकासाभिमुख अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी!

Read Time:8 Minute, 33 Second

नांदेड दि. १२-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा एकूण २४७कोटी २२ लक्ष रुपयाचा अर्थसंकल्प अधिसभासभेत मांडण्यात आला. समाजापयोगी संशोधनाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प दि. ११ मार्च रोजीच्या आधीसभा सभागृहातील बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.एल.एम. वाघमारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते. 

एकूण २४७कोटी २२ लक्ष रुपयाच्या या अर्थसंकल्पात १५ कोटी ७९लक्ष रुपयांची तूट आहे. गत वर्षीच्या अर्थसंकल्पात ४१कोटी ४४ लक्ष रुपयांची तुट होती.या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थी, विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयेयांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. 

विद्यापीठांमध्ये ‘सेंट्रल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज फॉर मल्टीडिसिप्लनरी रिसर्च अँड इन्वोव्हिटीव्ह’ च्या स्थापनेसाठी ११ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. सेंट्रल कॉम्प्युटिंग फॅसिलिटीजसाठी १.५ कोटीची तरतूद आहे. या दोन्ही सेंट्रर चा उपयोग विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही केंद्रामुळे मूलभूत, समाजापयोगी, नवीन आंतरविद्याशाखीय संशोधन कार्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होणार आहेत. यामुळे संशोधनाला चालना मिळेल व औद्योगिक प्रकल्प यामधून तयार होतील. 

संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘रिसर्च असोसिएट’ या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये २० लक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. ‘कुलगुरू सहाय्यता निधी’ या योजनेकरिता १५ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.‘विद्यार्थी दत्तक योजना’ करिता १५ लक्ष. ‘सॉफ्टस्किल अँड पर्सनालिटी डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग’ करीता २५ लक्ष. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षात परदेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी देण्याकरिता १० लक्ष. ‘स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्र’ करिता २० लक्ष. ‘स्टुडंट्स वेल्फर अँड अवार्ड स्कीम’ म्हणजेच ‘श्वास’ करिता २० लक्ष. पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रासाठी पेपर सादरीकरणासाठी १५ लक्ष. ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत २० लक्ष. खेळाडू विद्यार्थ्यासाठी पारितोषिक योजना करिता ५लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचाही विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, चर्चासत्र, परिषद इ. हजर राहण्यासाठी १० लक्ष रुपयांची तरतूद केलेली आहे. कर्मचारी कल्याण निधिकरिता १५ लक्ष. कोव्हीड उपाययोजना करीता १५ लक्ष. कोव्हीड उपचारासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्याकरिता १कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

डॉ.शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र इमारत बांधकामासाठी शासनाकडून ४४कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यांपैकी २ कोटी ६२ लक्ष्य प्राप्त झाले आहेत.प्रस्तावित वर्षात १० कोटी रुपये प्राप्त होतील त्या अनुषंगाने तरतूद करण्यात आलेली आहे. महिला जागृती विषयक व कार्यशाळेकरिता ५ लक्ष. हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजच्या सोलार सिस्टिम करिता ५ लक्ष. परिसर सुशोभित करण्याकरिता ९३ लक्ष. दिव्यांग साय्यता अंतर्गत ७कोटी ३५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. हिंगोली येथे महाराष्ट्र शासन अनुदानअंतर्गत मुला-मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. त्यासाठी संशोधन प्रोत्साहन योजना करिता १५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेण्यासाठी २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लघुसंशोधक प्रकल्पासाठी ५० लक्ष.संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहण्यासाठी १५ लक्ष आणि संकुलातील शिक्षकांनाही १५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. भाषा दिन करिता ७ लक्ष. मराठी भाषा संवर्धन करिता ५लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या विकासासह लातूर येथील उपकेंद्राच्या विकासाचाही विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे.उपकेंद्राच्या कंपाउंड वॉल साठी १५ लक्ष. मुला-मुलींचे वस्तीग्रह बांधकामासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

या अर्थसंकल्पावर डॉ. अंबादास कदम, डॉ. डी. एम. मोरे, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. अशोक मोटे, डॉ. युवराज पाटील, डॉ. दिपक चाटे, अजय गायकवाड, डॉ. महेश मगर इत्यादींनी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षण व संशोधन, विद्यार्थी विकास, शिक्षक प्रशिक्षण यावर सूचना मांडल्या व त्याचा अंतर्भाव सदर अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला. उपस्थित सर्व सभासदांनी हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे आणि पुढील काळात विद्यापीठाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × three =

Close