स्वदेशी बनावटीची हायड्रोजन इंधन बस विकसित

Read Time:2 Minute, 36 Second

नवी दिल्ली : केपीआयटी आणि वैज्ञानिक, औद्योगिक संशोधन परिषदेकडून (सीएसआयआर) पहिली स्वदेशी बनावटीची हायड्रोजन इंधन सेल बस विकसित करण्यात आली असून, रविवारी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले.

स्वदेशी बनावटीची ही बस पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रभावी पर्याय असून, त्यामुळे मालवाहतूक क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वासही डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. या वेळी केपीआयटीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित उपस्थित होते. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (सीएसआयआर-एनसीएल) आवारात अभियांत्रिकी प्लॅस्टिकच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या बिस्फेनॉल प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटनही डॉ. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले या वेळी उपस्थित होते.

वैज्ञानिकांशी संवाद साधताना डॉ. सिंह म्हणाले की, देशात सध्या नवउद्योगाचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये ७५ हजारांहून अधिक नवउद्योग सुरू झाले आहेत. त्यापैकी शंभरपेक्षा अधिक नवउद्योग युनिकॉर्न म्हणून नावारूपाला आले आहेत. वैज्ञानिकांनी सरकारी नोकरीचे आकर्षण सोडून या नवउद्योगांच्या शाश्वत विकासासाठी आपले योगदान द्यावे. देशातील नवउद्योग जगताच्या विकासासाठी शैक्षणिक, संशोधन संस्था आणि उद्योगांनी भागीदारी करणे उपयुक्त ठरेल. विज्ञानामुळे सर्वसामान्यांचे जगणे सुकर होते. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एनसीएलसारख्या संशोधन संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − two =