August 19, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

Read Time:6 Minute, 36 Second

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही यावर त्यांचे मत दिले आहे. राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्याला अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करून लढायची हा निर्णय जिल्हा पातळीवर व्हावा, असे माझे मत आहे. जिल्हा पातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा’, असे अजित पवार म्हणाले.

राजकीय चर्चा नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ९ सप्टेंबर रोजी भेट झाली. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आज राजकीय चर्चा नाही. असती तर आम्हाला बोलवलं असतं’, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी भूमिका मांडली. आम्हाला काम करताना विकासकामाला निधी मिळत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनल्यामुळे वेगळे समीकरण झाले. स्थानिक पातळीवर तेवढा समन्वय अजून झाला नाही.’

काही भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आता गणपती उत्सव आहे. मार्केटमध्ये गर्दी आहे. यामुळे कोरोना रुग्ण वाढले तर, म्हणून टास्क फोर्स, केंद्राने सूचना दिली आहे. तिस-या लाटेची शक्यता बघून नियम लावले. उद्या काही झालं तर दोष सरकारवर येईल, असे अजित पवारांनी नमूद केले आहे.

कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनीती, ओबीसींचे राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी-माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील कामं करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या मीटिंगध्ये पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. तसेच आमदारांनाही बोलावलं होतं. आमदारांची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पराभूत उमेदवार असे म्हणाले की त्यांना विकासकामे करण्यासाठी निधी कमी प्रमाणात मिळतो. ही त्यांची अडचण आहे.’’

समन्वयाचा अभाव
‘‘निवडणुका झाल्यानंतर शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन पक्षांनी सरकार स्थापन केले. यापूर्वी निवडून येताना शिवसेनचा उमेदवार काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेच्या विरोधात निवडून आला. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही राजकीय समीकरणं बदलली. मात्र स्थानिक पातळीवर काही प्रश्न निर्माण होतात. स्थानिक पातळीवर जेवढे एकमत व्हायला पाहिजे होते. तेवढे झाले नाही. एकोपा, समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कार्यकर्ते, नेते या गोष्टी बोलून दाखवतात’’, असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
‘‘शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदाच भेटत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर देखील अनेकदा पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आज देखील लोकांच्या काही समस्यांवर निर्णय घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. शरद पवार ५० वर्षे समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभोवती देशाचे आणि राज्याचे राजकारण फिरत असते. राज्याच्या प्रश्नाकरिता चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − fifteen =

Close