January 22, 2022

सोमवारपासून निर्बंधांची अंमलबजावणी, चार वाजता दुकानं बंद, पाचच्या आत घरात

Read Time:5 Minute, 45 Second

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) डेल्टा प्लस या अधिक घातक विषाणूचा धोका व कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोमवारपासून संपूर्ण राज्यात अधिक कडक निर्बंध लागू होणार आहेत. नवीन नियमावलीनुसार सर्व दुकानं चार वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार असून, सायंकाळी ५ नंतर सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरता येणार नाही. मॉल्स आणि चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. किमान एवढे निर्बंध लागू राहणार असून यापेक्षा अधिक कठोर निर्बंधांची गरज असेल तर ते लागू करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रोज दहा हजाराच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत असून निर्बंध शिथिल झाल्याने हा आलेख पुन्हा वर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच डेल्टा प्लस या अधिक घातक विषाणूचा धोका वाढला आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांना तिसऱ्या गटामध्येच ठेऊन निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध शिथिल करताना जे पाच टप्पे ठरवले होते त्यातील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सोमवारपासून अंमलात येतील. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. तर अत्यावश्यक वर्गात न येणारी दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील व शनिवारी व रविवारी बंद राहतील.

मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.

उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्क्यांच्या क्षमतेनं उघडीतल. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील. सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.

खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू ठेवता येतील.

सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू असेल. लग्न समारंभाला ५० तर अंत्यविधीला २० लोक उपस्थित राहू शकतील. संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी, तर ५ नंतर संचारबंदी लागू असेल. तातडीच्या कारणा व्यतिरिक्त फिरण्यावर निर्बंध असतील.

किमान निर्बंध
– अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी ४वाजेपर्यंत सुरू राहतील.
– अन्य दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील व शनिवार आणि रविवारी पुर्णतः बंद राहतील.
– मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृहे बंद राहतील.
– रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील व त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू र ठेवता येईल.
– लोकल ट्रेन केवळ वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी सुरु राहील.
– सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.
– खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू ठेवता येतील. सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू.
– सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
– लग्न समारंभात ५० लोक जण उपस्थित राहू शकतील.
– अंत्यविधीला २० लोक लोकांना परवानगी
– ई-कॉमर्स नियमित सुरू राहील.
– संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी, ५ ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − 1 =

Close