January 19, 2022

सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

Read Time:3 Minute, 39 Second

नवी दिल्ली : सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला. मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रेंचसह अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, तर मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोनाली प्रकाश नवांगुळ, (मूळ गाव-बत्तीस शिराळा) वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झाल्याने त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली त्या कोल्हापुरात आल्या. हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. २००७ साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या.

सोनाली नवांगुळ या भारतातील ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद’ हे पुस्तक ‘मेनका प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणा-या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर’ या नावाने ‘मनोविकास’ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे, याकरता ‘मनोविकास’ प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली, त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे.

साहित्य संपदा
ड्रीमरनर (अनुवाद) : मूळ लेखक ऑस्कर पिस्टोरिअस व गियान्ने मेरलो
स्वच्छंद : ललित सदर लेखन
मध्यरात्रीनंतरचे तास (अनुवाद) : सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी
मेधा पाटकर : नर्मदा बचाओ आंदोलनाचा बुलंद आवाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 1 =

Close