January 19, 2022

सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश

Read Time:4 Minute, 54 Second

औसा (संजय सगरे) : एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलीने युपीएससी परीक्षेत देशात ५७७ क्रमांक पटकावला असून एका सामान्य कुटुंबातील या मुलीने मिळालेल्या या यशाने कुटुंबाचा आनंद गगनाला मिळाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. औसा तालुक्यातील टाका येथील अशोक कदम यांनी गावातील भिमाशंकर विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा बजावली. २०१५-१६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांची पत्नी संध्या या गृहिणी आहेत. या दाम्पत्याला चार मुलीच आहेत. कुटुंबात केवळ चार एकर जमीन असल्याने या कुटुंबातील मुलींना शिक्षण देण्यासाठी कुटुंबाला सतत आर्थिक कसरत करून चारही मुलींना त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. मुलगा हा घरचा नाव पुढे घेऊन जातो ही भावना या कुटूंबातील चार मुलींनी पुर्ण केली आहे.

चार मुलींपैकी पुजा कदम ही सर्वात लहान मुलगी तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयात झाले. यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत झाल्यानंतर पुजाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. कुटुंबाची व पुजाचे स्वप्न युपीएससीचे असल्याने पुजाने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुणे येथील एका खाजगी शिकवणीव्दारे तिने युपीएससी परिक्षेसाठी तयारी सुरू केली.दररोज तासनतास अभ्यास करणा-या पुजाची संधी या अगोदर एकदा झालेल्या युपीएससी परीक्षेत हुकल्याने निराश न होता. पुर्ण तयारीनिशी पुन्हा या परीक्षेत उतरून देशात ५७७ क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाने संपूर्ण लातूर जिल्ह्याची मान उंचावली आहे.

आपल्या कुटुंबातील चारही मुलींने वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करून आमची मान समाजात उंचावली आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या पुजाच्या यशाने आम्ही अक्षरश: भारावून गेलो असून देशात आपल्या गावची व देशाची मान उंचावून तिने दाखवून दिले आहे की मुलींना शिक्षणाची संधी दिली तर ती यश खेचून आणू शकते अशी प्रतिक्रिया पुजाचे वडील अशोक कदम यांनी दिली आहे.

टाका सारख्या एका छोटयाशा गावात चार एकर जमीन व एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या एका शिक्षकाच्या मुलीने उच्च शिक्षण घेवून यशाची घेतलेली भरारी हि नक्कीच कौतुकास्पद असून आता युपीएससी परिक्षेत पुजाने देशात ५७७ क्रमांक पटकावला असून या यशाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

कदम दाम्पत्याला चार मुली आहेत. यापैकी पहिली मुलगी जयश्री हिने एमएससी शिक्षण घेतले. यानंतर विवाह झाल्यावर काही वर्ष जर्मनी येथे राहिल्यानंतर ती सध्या औरंगाबाद येथे आपल्या कुटुंबासह आहे. दुसरी मुलगी पल्लवी हिने अभि-यांत्रिकी शिक्षण पुर्ण केल्या नंतर आता त्या पुणे येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत. तर तिसरी मुलगी पुनम यांनी एमबीबीएस व एमडीचे शिक्षण पुर्ण करून आपल्या पतीसह पुणे येथे एक खाजगी रुग्णालय उभे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

Close