
सुपारी देऊन बियाणींची हत्या
कुटुंबीयांचा आरोप, आरोपीला तात्काळ अटक करा
नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या मारेक-यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. मंगळवारी संजय बियाणी यांची दिवसाढवळ््या गोळ््या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला. दरम्यान, या घटनेनंतर व्यापारी, व्यावसायिक, बिल्डर यांच्यात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष पाहावयास मिळाला.
संजय बियाणी यांच्या अत्यंसंस्कार प्रसंगी जमलेल्या व्यावसायिक, गावकरी आणि कुटुंबियांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला, तर या प्रकारे नांदेड शहरातील व्यापारी, उद्योजकांना, धमकी आणि प्राणघातक हल्ले होऊनही पोलिस प्रशासन काय करत आहे, असा सवाल कुटुंबियांनी केला. संजय बियाणी यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांचा सहभाग होता. आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत लोकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या, ग्रामीण भागातील शेतकरी गावकरी यांना नेहमीच मदत करणा-या, गरजू लोकांना मदत करणा-या आणि गरीब गरजूंना ७६ हक्काची मोफत घरे देणा-या अशा व्यक्तीची दिवसाढवळ््या क्रूरपणे हत्या झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्येच्या या घटनेस २४ तास उलटूनही हल्लेखोर अद्याप पोलिसांना हाती न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नांदेड शहरात दिवसाढवळ््या बांधकाम व्यासायिकाची गोळ््या झाडून झालेली हत्या म्हणजे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणारी घटना असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी आपण पोलिस अधिका-यांची बैठक घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले, तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.