
सिंधूने जेतेपदासह रचला इतिहास ; चीनवर दणदणीत विजय
मुंबई : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी ही हिचा तीन गेम्समध्ये २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला.
सिंधू आणि वँग यांच्यातील हा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात सिंधूने झोकात सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने एका पाठोपाठ एक गुण पटकावले आणि वँगला निष्प्रभ करून सोडले होते. कारण सिंधूच्या फटक्यांचे कोणतेच उत्तर यावेळी वँगकडे नसल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे सिंधूने हा पहिला गेम २१-९ असा सहजपणे जिंकला. त्यानंतर सिंधू हा सामना सहजपणे जिंकेल, असे वाटत होते.
कारण पहिल्या गेममध्ये तिने दमदार खेळ केला होता. पण चीनच्या वँगने हार मानली नाही. दुस-या गेममध्ये तिने जोरदार पुनरागमन करत सिंधूला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. सिंधूने यावेळी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिला यावेळी जास्त गुण पटकावता आले नाहीत. त्यामुळे दुस-या गेममध्ये वँगने २१-११ विजय साकारला. वँगच्या या विजयामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत आला होता. त्यामुळे आता तिसरा गेम कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तिसरा गेम हा दोन्ही खेळाडूंसाठी निर्णायक ठरणार होता. कारण जो तिसरा गेम जिंकेल त्याला सामन्यासह जेतेपद पटकावता येणार होते. त्यामुळे तिस-या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला. तिस-या गेममध्ये सिंधूने सर्वस्व पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. कारण हे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न तिच्या देहबोलीत दिसत होते. सिंधूने यावेळी जोरदार फटके मारले आणि चीनच्या वँगला पुन्हा एकदा निष्प्रभ केले.
तिस-या गेममध्ये सिंधूने २१-१५ अशी बाजी मारली आणि हा गेम जिंकत जेतेपद आपल्या नावावर केले. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते.