सार्वजनिक उद्योग वाचवायला हवेत

Read Time:2 Minute, 53 Second

मुंबई : भारतात खासगी क्षेत्रापेक्षा दहा पटीने सार्वजनिक क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे आरक्षण वाचवायचे असेल तर देशातील सार्वजनिक उद्योग वाचविले पाहिजेत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आरक्षणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मंगळवारी प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस आयोजित कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर लिखित ‘समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल, चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, आमदार कपील पाटील, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राज दत्त, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर उपस्थित होते.

आपण नेहमी सत्तेचे राजकारण करतो. परंतु समाजात बदल झाला का ते दिसत नाही. सत्तेचे राजकारण चालत राहील, त्यात चुकीचे काही नाही. परंतु त्यात विचाराची राजनीती दिसली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. आरक्षण वाचले पाहिजे, अशी मागणी होते. परंतु त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. भारतात खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्र दहा पटीने मोठे आहे. आरक्षण वाचवायचे असेल तर हे खासगी क्षेत्र वाचविले पाहिजे. खासगी क्षेत्र वाचविणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वाचवणे, ही भूमिका असायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

देशातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना पत्रकार दिलीप मंडल म्हणाले की, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत थोडा मागे गेला आहे. वेगवेगळ््या मार्गाने आरक्षण बंद केले जात आहे. मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन केले जात आहे, ते एक आपणासमोर आव्हान आहे, परंतु ते स्वीकारले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 − 3 =