January 21, 2022

सात प्लॉटस् घेतले ताब्यात

Read Time:3 Minute, 34 Second

लातूर : प्रतिनिधी

येथील सर्व्हे ९५ मधील गायरान जमिनीत स्वातंत्र्य संग्राम सैनिक सहकारी गृहनिर्माण सोसायटीसाठी दिलेला प्लॉट शर्थभंग झाल्याने त्यावरील अतिक्रमण काढून प्लॉट शासनाच्या ताब्यात घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. त्यानुसार दि. २३ नोव्हेंबर रोजी त्यावर कारवाई करुन सदर जागेवर शासनाचा ताबा घेण्यात आला आहे.

मौजे लातूर येथील सर्वे नंबर ९५ मधील शासकीय गायरान जमीनीतून तत्कालीन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे आदेश क्रमांक १९७१/एलएनडी/२६, दिनांक २७ ऑगस्ट, १९७१ च्या आदेशान्वये सर्वे नंबर ९५ मधील ३ एकर ३० गुंठे जमीनन स्वातंत्र्य संग्राम सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था, लातूर यांना निवासी बांधकामासाठी देण्यात आलेली होती. परंतु, या प्रकरणात विनापरवानगी प्लॉटची विक्री, भाडेपट्टा, बक्षीसपत्राद्वारे दुस-या व्यक्तींना हस्तातंरण, अतिक्रमण, जागेचा वापर न करणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने चौकशीअंती प्रकरणात शर्थभंग झाल्याने जिल्हाधिकारी, लातूर यांनी दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ चे आदेशान्वये शर्थभंग झालेले प्लॉट तात्काळ जमा करुन घेण्याबाबत आदेशित केले होते.

त्याप्रमाणे प्रकरणात शर्थभंग झालेले प्लॉट ताब्यात घेण्यासाठी नायब तहसीलदार महसूल एक व दोन यांच्या अधिपत्याखाली दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी सूनील यादव व तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात शर्थभंग झालेले प्लॉट क्रमांक १५, २०, ३३, ३७, ३८, ४६, ४७ असे एकूण सात प्लॉट ताब्यात घेवून सदर प्लॉटवर महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची जागा अशा प्रकाचे सुचना फलक लावण्याची कार्यवाही करण्यात आली.

या कार्यवाहीच्या वेळी तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, भिमाशंकर बेरुळे, सह निबंधक सहकारी संस्था, पोलीस निरीक्षक बावकर, मंडळ अधिकारी झाडे, घाडगे चव्हाण, खंदाडे, श्रीमती अकोले व तलाठी दत्ता शिंदे, कतलाकुटे, तावशीकर, फड, बोधणे, डोईजोडे, गायकवाड, राठोड, श्रीमती पूरी, श्रीमती सुर्यवंशी, कोतवाल दिनेश उटगे, अंबादास हे कारवाईसाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

Close