सांगली, कोल्हापूरला पावसाने झोडपले

Read Time:2 Minute, 0 Second

कोल्हापूर : कोल्हापूरसह जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी आलेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तसेच सांगली जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. तसेच अनेक ठिकाणी पत्रे उडाले. त्यातच पावसाने झोडपल्याने काही वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव, जोरदार पाऊस यामुळे अवघे कोल्हापूर शहर काही काळातच जलमय झाले होते. झाडे कोसळल्याने विजेचा व्यत्यय, जलकोंडी, वाहतूक अडथळा यासारख्या अडचणी उद्भवल्या. यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने कळवले होते.

कणाननगरमध्ये मार्शल हॉल जवळील भाले यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड पडल्याने भाडेकरूंच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.विजेच्या खांबावरील तारा तुटल्याने अनेक भागात अशी धोकादायक परिस्थिती उद्भवली होती.
सांगलीमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील होता. यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी फेरीवाल्याने मोठी छत्री पकडून थांबावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + 15 =