सर्व बंडखोर आमदार सुरतमधून गुवाहाटीत!

Read Time:2 Minute, 24 Second

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, एकनाथ शिंदे यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांना सुरतवरून एअरलिफ्ट करण्यात येत असून त्यांना आता गुवाहाटीला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. सुरतच्या हॉटेलमधून गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून या आमदारांना विमानतळाकडे नेण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३५ आमदार असून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले आहे. हे आमदार पहाटे सुरतमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता या सर्व आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येत असून रात्री एक वाजेपर्यंत ते गुवाहाटीला पोहोचणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली
तातडीची मंत्रिमंडळ बैठक
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३२ आमदार आहेत. त्यांच्यासोबत प्रहारचे बच्चू कडू असल्याचेही समजते, तर ४ अपक्ष आमदार उद्या सूरतला पोहोचणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. तसेच उद्या बुधवारी दुपारी १ वाजता तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 + 3 =