सर्वच नवे मंत्री कोट्यधीश | शिंदे मंत्रिमंडळात ७० टक्के मंत्री कलंकित

Read Time:3 Minute, 30 Second

भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वांत श्रीमंत मंत्री
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याच्या ३९ दिवसांनी मंगळवारी महाराष्ट्रात शिंदे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात एकूण १८ जणांना कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ जणांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळातील प्रत्येक जण कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत भाजपचे मलबार हिल्स मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे २ कोटींची मालमत्ता पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे आहे.

शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १२ मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील काही जणांवर गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर १८, तर उपमुख्यमंत्र्यांवर ४ गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच सध्याच्या शिंदे मंत्रिमंडळात असे ७० टक्के मंत्री कलंकित आहेत.
मंत्रिमंडळातील भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक ९ गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध ६, मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत, तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे, तर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.

शिंदे गटातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक ९ गुन्ह्यांची नोंद पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध आहे. त्याखालोखाल ८ गुन्ह्यांसह अब्दुल सत्तार यांचा क्रमांक लागतो, तर संजय राठोड यांच्याविरुद्ध ४ गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान, शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − 17 =