
समीर ज्ञानदेव वानखेडेंच्या नावे जातपडताळणीच नाही?
माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला दावा
बारामती : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा मलिक यांनी केला होता. या आरोपामुळे राज्यात मोठा गदारोळही झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने जातपडताळणीच झाली नाही. त्यामुळे या नावाने एकही जात प्रमाणपत्र जारी केली नसल्याची धक्कादायक माहिती जात पडताळणी समितीने माहितीच्या अधिकारात दिली आहे, असा दावा बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केला आहे.
बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी जात पडताळणी समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली होती. समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे देण्यात आलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र व सोबत जमा केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची जात पडताळणी समितीकडे मागणी करण्यात आली होती. त्यावर जात पडताळणी समितीने समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने जात प्रमाणपत्र जारीच केले नसल्याचे म्हटले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर कार्यालयाचा उपलब्ध अभिलेख तपासण्यात आला. त्यामध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याचे जात पडताळणी समितीने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांनी नोकरीसाठी नेमके कोणते प्रमाणपत्र दिले, हा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, एकीकडे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल शंका उपस्थित केलेली असतानाच माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्यापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.