
समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा कायम : संभाजी राजे
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास मी तयार असून समाजातील गरीबांना न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने टोलवा टोलवीचे नाटक बंद करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही. अशी भूमिका खा.संभाजी राजे यांनी नांदेड येथील मुक मोर्चात बोलताना जाहीर केली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष हे नांदेडचे सुपुत्र आहेत. पण ते कुठे आंदोलनात दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करून छत्रपती राजे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली.
सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मुक आंदोलन शुक्रवारी छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थित झाले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहु राजे यांच्या प्रतिमांचे पुजन करून छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठा समाजाने आपल्या आरक्षण मागणीसाठी भरपूर आंदोलने केली. पण त्यात दिलेल्या शब्दांना सरकार फिरले. राज्यसभेमध्ये मला समाजाविषयी बोलण्याची संधी मागितल्यावर सुध्दा दिली नाही म्हणून खासदारकी सोडायची तयारी केली. त्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली होती हे सांगितले. राज्य सरकार केंद्राकडे तर केंद्र सरकार राज्याची जबाबदारी आहे असे सांगत आहे. आम्हला टिकणारे आरक्षण पाहिजे. आता पुन्हा आरक्षण हवे असेल तर, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्द करावे लागेल. राज्यांनी प्रामुख्याने काय केलं पाहिजे. केंद्राने अमेनमेंट बदलली पाहिजे. ५० टक्केचा कॅब वाढून दिला पाहिजे असे संभाजीराजे म्हणाले.
खा. संभाजी राजे यांनी राज्य शासन व केंद्र शासनावर टिका करत आरक्षणाची टोलवाटोलवी बंद करुन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. वंचिताना आरक्षण मिळालेच पाहिजे या मुद्यावर मी ठाम असून राज्य शासनाच्या वतीने गुरुवारी मराठा समाजाला सवलती देण्यात आल्याचे पत्र मला मिळाले असून मला या मागण्या मान्य नाहीत. आरक्षण देण्यात यावे हीच माझी प्रमुख भूमिका असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तो पर्यंत माझा लढा कायम राहील कोणत्याही परिस्थिती आरक्षण मिळविल्या शिवाय मी गप्प बसणार नाही असेही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी स्पष्ट केले.तर सर्वच नेते,पदाधिकारी आंदोलनात सहभागी होत आहेत.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष हे नांदेडचे सुपुत्र आहेत. पण ते कुठे आंदोलनात दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करून छत्रपती राजे यांनी अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, बालाजी कल्याणकर, माधवराव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे, भीमराव केराम, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर प्रतिनिधी विजय येवनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
इतर नेते भाजप प्रणित आहेत का: साले
नांदेड येथे काढण्यात आलेला मराठा आरक्षण संदर्भातील मुकमोर्चा आंदोलन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रणित असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक पाहता या आंदोलनात सेनेचे खा. हेमंत पाटील, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, आ. शामसुंदर शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर, यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. मग हे भाजप प्रणित आहेत का असा सवाल भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ कडेकोट बंदोबस्त
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी मुक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत नांदेडात हे मुक आंदोलन पारपडले. मुक आंदोलनाच्या अनुषंगाने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे पालकमंत्री यांच्या निवासस्थान परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाजीनगर भागातील वाहतूकही काहीवेळ बंद करण्यात आली होती.
आ.रातोळीकरांची तत्परता
मराठा आरक्षणासाठी नांदेड येथे काढण्यात आलेल्या या मुक आंदोलनात तिरूपती येथुन तत्काळ परत येऊन भाजपचे आ.राम पाटील रातोळीकर हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.त्यांच्या या तळमळीचे अनेकांनी कौतुक केले.