समाजाने व्यवस्था बदलाची शक्ती गमावली

Read Time:4 Minute, 29 Second

ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांची खंत, गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवायचाय
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. राज्यघटना टिकली, तरच लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली, तरच आपण टिकणार आहोत. व्यवस्था बदलून टाकण्याची शक्ती समाज व्यवस्थेत आहे. मात्र, समाज सध्या भयाखाली जगत आहे. त्यांना व्यवस्था बदलण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, या समाजाने संपूर्ण व्यवस्था बदलण्याची शक्ती हरवलेली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. हा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न असून, हा आत्मविश्वास मिळविला तरच जग बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथील दयानंद सभागृहात रविवारी प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समता परिषदेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष मकरंद सावे, बापूसाहेब भुजबळ, शहराध्यक्ष पद्माकर वाघमारे, जिल्हाध्यक्ष खुणे आदी उपस्थित होते. देशात क्रांती कोण करू शकते, याची जाण महात्मा ज्योतिबा फुले यांना होती. त्यांनी संपूर्ण क्रांतीचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी हे प्रबोधन शिबिर घ्यावे लागत आहे, असे कसबे म्हणाले. आता डावे थंडावले आणि उजव्यांना रान मोकळे झाले. आता त्यांना तुमच्यावर राज्य करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल बोलताना ज्येष्ठ विचारवंत हरी नरके म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आरक्षणविरोधी आहेत. त्यांना मुळात आरक्षणमुक्त भारत करायचा आहे. मात्र, दुसरीकडे आरक्षण देण्याच्या भूलथापा मारून त्यांनी ओबीसींची फसवणूक केली. ओबीसी नेत्यांच्या रेट्यामुळे २०११ मध्ये मनमोहनसिंग सरकारने स्वतंत्र जनगणनेचे काम सुरू केले. त्याचा अहवाल २०१४ मध्ये आला. त्यावेळी मोदी सरकार सत्तेवर होते. आरक्षण टिकविण्यासाठी याचा डाटा आवश्यक होता. मात्र, मोदी सरकारने तो डाटा दिलाच नाही. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गमवावे लागले. याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप नरके यांनी केला.
आरक्षण आपल्या हक्काचा वाटा
व्यवस्थेला प्रश्न विचारला जातो, तेव्हा ही व्यवस्था घाबरते. त्यामुळे मागील अडीच हजार वर्षांपासून ही व्यवस्था प्रश्न मारायचे काम करीत आली आहे. मुळातच व्यवस्थेने आपल्याला विचार करण्याचे स्वातंत्र्यच दिले नाही. जात जन्माने येत नाही. मात्र, जातीत जन्म घेतला आणि चूक केली. पण ज्यांनी ही चूक केली, त्यांनीच ती दुरुस्त केली पाहिजे, त्यासाठी संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले. आरक्षण जातीअंतासाठी, सामाजिक न्यायासाठी तर आवश्यक आहेच. त्यापेक्षाही आपला जो वाटा आहे, तो मिळविलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 − seven =