सदाबहार भूपिंदर

Read Time:9 Minute, 38 Second

मनोरंजन विश्वाने आणखी एक दिग्गज गायक गमावला आहे. भारदस्त आवाजाचे गायक म्हणून ओळखले जाणारे आणि असंख्य गझला सर्वतोमुखी करणारे ज्येष्ठ गायक भूपिंदरसिंह यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला. भूपिंदर यांचा दमदार आणि अनोखा आवाज तसेच आगळीवेगळी गायनशैली रसिकांच्या कायम स्मरणात राहील. मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे… या त्यांनीच गायिलेल्या ओळी त्यांच्या करिअरचे चपखल वर्णन करणा-या आहेत. उत्कृष्ट गझल आणि भावपूर्ण गाण्यांमुळे ते चिरकाल रसिकांच्या मनात राहतील.

करोगे याद तो हर बात याद आएगी… असे सांगून ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदरसिंह आपल्यातून निघून गेले. नाम गुम जाएगा, बीती ना बिताई रैना, दिल ढूंढता है अशी एक से एक अजरामर गीते भूपिंदर यांच्या आठवणी कायम ताज्या ठेवतील. मनोरंजन विश्वाने त्यांच्या रूपाने आणखी एक दिग्गज गायक गमावला आहे. भारदस्त आवाजाचे गायक म्हणून ते ओळखले जातात. आपल्या उत्कृष्ट आवाजाने त्यांनी बॉलिवूडमधील अनेक गीते अजरामर केली. त्यांनी गायिलेली सदाबहार गाणी लोकांच्या ओठांवर कायम रेंगाळत राहतील.

ब्रिटिशांच्या आमदनीत म्हणजे १९४० मध्ये भूपिंदर यांचा जन्म पतियाळा येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी भूपिंदर यांना संगीताचे धडे दिले. वस्तुत: भूपिंदर यांना संगीताविषयी अरुची निर्माण झाली होती, कारण त्यांचे वडील खूप कडक होते. वडिलांच्या शिस्तीमुळेच संगीत शिकणे त्यांना आवडेनासे झाले होते. परंतु जसजशी त्यांची समज वाढत गेली, तसतशी त्यांच्यात संगीताची आवड आपोआप रुजली. संगीताचे प्राथमिक धडे अशा प्रकारे घरातच गिरवल्यानंतर त्यांच्यात गझल गायनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमधून कारकीर्दीला सुरुवात केली. आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम केल्यानंतर त्यांना दूरदर्शनवरून गाण्याची संधी मिळाली. आकाशवाणीमुळेच त्यांना या क्षेत्रात अनेक संधी मिळत गेल्या.

गायनाबरोबरच भूपिंदरसिंह यांचे गिटारवादन खूप चांगले होते. तसेच व्हायोलिनसुद्धा ते सफाईदारपणे वाजवत असत. रेडिओवर त्यांचे गाणे ऐकून संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले आणि ‘हकीकत’ नावाच्या चित्रपटात गाण्याची संधी सर्वप्रथम दिली. या चित्रपटात त्यांनी ‘होके मजबूर मुझे बुलाया होगा’ ही गझल त्यांनी गायिली. या गाण्यामुळे त्यांना ओळख मिळाली आणि मग ते बॉलिवूडमध्ये गातच राहिले. भूपिंदर यांनी लो-बजेट चित्रपटांमध्ये गाणे सुरूच ठेवले आणि याच काळात त्यांनी स्वत: लिहिलेल्या गझलांचे प्रयोग केले. ड्रम आणि स्पॅनिश गिटारच्या संगीतावर गायिलेल्या या गझलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर बॉलिवूडमधील मौसम, सत्ते पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां, हकीकत आदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी गायिली. त्यांच्या पत्नी मिताली सिंह याही गायिका आहेत. दोघांनी १९८० मध्ये लग्न केले. नंतर दोघांनी एकत्रितपणे अनेक कार्यक्रम सादर केले आणि त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धीही मिळाली.

भूपिंदर स्वत: संगीतकारही होते आणि गझलकडे असलेला लोकांचा ओढा आधुनिक संगीतशैलीमुळे कमी झाला आहे, असे त्यांचे मत होते. ते म्हणायचे, गझल म्हणजे कवीचे विचार, त्याची विचारसरणी आणि त्याच्या भावना यातून होणारी रचना होय. ती समजून घेतल्याशिवाय गायिली तर गझल चांगली होत नाही. त्याचप्रमाणे एका प्रश्नाला उत्तर देताना ते पूर्वी असेही म्हणाले होते की, आजकाल गझल श्रोते आणि निर्मात्यांमधील वातावरण पूर्वीसारखे राहिलेले नाही. आज लोक स्टॉर्मट्रूपर्स आहेत आणि त्यांना संयमाने केलेल्या गोष्टी आवडत नाहीत. गाण्याच्या तयारीसाठी पूर्वी गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक एकत्रितपणे काम करीत असत. त्यातूनच एक उत्कृष्ट नमुना तयार होत असे. आजकाल निर्मात्यांना ऐकण्यासाठीही वेळ नाही; परंतु त्याहून महत्त्वाचा आहे तो प्रेक्षकांमध्ये झालेला बदल. त्यांच्या मते, ६०-७० च्या दशकात निवृत्त लोक गझल ऐकत असत. नंतरच्या काळात तरुणांचा ओढा त्याकडे वळला; परंतु त्यांची संख्या खूपच कमी होती.

भूपिंदर यांचा दमदार आणि अनोखा आवाज तसेच आगळीवेगळी गायनशैली रसिकांच्या कायम स्मरणात राहील. मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे… या त्यांनीच गायिलेल्या ओळी त्यांच्या करिअरचे चपखल वर्णन करणा-या आहेत. उत्कृष्ट गझल आणि भावपूर्ण गाण्यांसाठी ते ओळखले जातात. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, एक अकेला इस शहर में अशी एकसे बढकर एक गाणी कोण विसरू शकेल? त्यांच्या सुवर्णकाळातील आठवणी सांगताना ते म्हणत, की त्यावेळी गीतकार, संगीतकार हे चित्रपटांमध्ये गझल सादर करण्यासाठी संधी आणि योग्य जागा शोधत असत आणि दिग्दर्शकाला अशी परिस्थिती निर्माण करण्यास सांगतही असत.

असे वातावरण पडद्यावर निर्माण केल्यामुळेच ‘ऐतबार’ चित्रपटातील ‘किसी नजर को…’ सारख्या गझल उठावदार झाल्या. आजकाल चित्रपटसृष्टीत खूपच नावाजलेले आणि प्रतिभासंपन्न संगीतकार आहेत. परंतु गझलसाठी पूर्वीसारखी संधी शोधली जात नाही, याबद्दल भूपिंदर यांना खंत वाटत असे. भूपिंदर यांनी त्यांच्या कारकीर्दीत एक-दोनदा अभिनयही केला होता; परंतु अभिनय करणे त्यांना आवडत नसे. अभिनयाच्या ऑफर्स येताच ते दिल्लीला पळून गेले होते आणि दोन-तीन महिन्यांनीच परतले होते, अशी आठवण खुद्द भूपिंदर सांगत असत. तो प्रसंग चेतन आनंद यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी एकदा सेटवर उभे राहून आपण दुसरा के. एल. सहगल पडद्यावर आणणार आहोत, असे घोषित केले होते. परंतु भूपिंदर पळून दिल्लीला जाणार आहेत, हे त्यावेळी त्यांना माहीतच नव्हते. दो दीवाने शहर में.. रात और दोपहर में.. हे त्यांना स्वत:चे सर्वाधिक आवडलेले गाणे होते, असे त्यांनी एकदा सांगितले होते.

गेल्या काही दिवसांपासून भूपिंदर सिंह आजारी होते. त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या भरदार आवाजाच्या गायकाला मदन मोहन यांनी मुंबईला बोलावून जेव्हा पहिल्यांदा संधी दिली, त्यानंतर त्यांना एका पाठोपाठ एक संधी मिळतच गेल्या. त्यांना कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच मोहंमद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे अशा दिग्गज गायकांबरोबर गायची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि गझलांसह आशयघन गाण्यांचा मोठा खजिना रसिकांसाठी मागे ठेवून त्यांनी या जगाचा रामराम घेतला.
– सोनम परब

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + seventeen =