संप संपेपर्यंत कोल्हापुरातील एसटी कर्मचा-यांना शिधा वाटप

Read Time:2 Minute, 33 Second

कोल्हापूर : राज्यातील एसटी कर्मचा-यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचा-यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली.

एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनस्थळी आज चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचा-यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला. हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचा-यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजपा घेत असल्याचे घोषित केले. हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचा-यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एसटी कर्मचा-यांचा संप संपुष्टात आणण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून हैदोस सुरू आहे. यांचे काही तरी नक्की होणार. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल, असे साकडे त्यांनी देवीला घातले. शिधावाटप झाल्यामुळे कर्मचा-यांना मोठा आधार मिळाला. काही कर्मचा-यांनी सरकार आमच्या रक्ताने थंड होणार असेल, तर त्यासाठी आहुती देण्यास तयार आहे, असे डोळयात अश्रू आणून सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी त्यांची समजूत काढली. शासनाशी भांडू आणि न्याय मिळवू; परंतु हिंसाचार करू नका, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. राज्य सरकारची ताठर भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − ten =