संपकरी एसटी वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू

Read Time:4 Minute, 49 Second

नांदेड:प्रतिनिधी

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांचा संप अजूनही सुरूच आहे.तणावामुळे शुक्रवारी सकाळी -हदयविकाराने नांदेड आगारातील एका संपकरी वाहकाचा मृत्यु झाला.यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी वाहकाचा मृतदेह सायंकाळपर्यंत मुख्य बसस्थानकातील आंदोलन स्थळीच ठेवला होता.याच दरम्यान अन्य एका महिला कर्मचा-याची प्रकृती खालावली आहे.या घटनांमुळे एसटी कर्मचा-यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचा-यांनी संप सुरू केला आहेक़ाही दिवसापुर्वी शासनाने या एसटी कर्मचा-यांना वाढीव वेतन देण्याची मागणी मान्य करून संप मिटवावा अशी सुचना केली परंतू आम्हाली ही वेतनवाढ अमान्य आहे,शासनाने महामंडळाचे विलिनीकरण करून घ्यावे हीच मागणी कायम ठेवून जवळपास ३७ दिवसापासून हा संप जिल्हयातील आगार व बसस्थानक परिसरात सुरू ठेवला आहे.यामुळे एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली असून प्रत्येक बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे.नांदेड येथेही मुख्य बसस्थानक व विभागीय कार्यालया पुढे संपकरी एसटी कर्मचा-यांनी ठाण मांडले आहे.सततचे आंदोलन आणि शासनाकडून मागणी मान्य होत नसल्याने कर्मचा-यांतील तनाव वाढत आहे.

याच तनावातून नांदेड आगातील वाहक दिलीप विठ्लराव वीर वय ५२ यांना बसस्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळीवरच गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास -हदयविकाराचा जबर धक्का आला होता.अन्य कर्मचा-यांनी त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.मात्र शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असतांना वाहक वीर यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.यामुळे संतप्त कर्मचा-यांनी शासनाचा निषेध करित मयत वाहक वीर यांचा मृतदेह दुपारपर्यंत बसस्थानकातील आंदोलनस्थळी आणून ठेवला होता.याच दरम्यान आणखी एका महिला कर्मचा-याची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.या घटनांमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली कर्मचा-यांनी शासनाने विलिनीकरणाची मागणी मान्य करावी अन्यथा वाहकाचा मृतदेह हलवू देणार नाही,अशी आक्रमक भुमिका घेतली.

या बाब विचारात घेऊन बसस्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान वाहक दिलीप वीर यांंच्या पत्नी रेखा वीर यांनी कुटुंबातील दोघांना महामंडळाची नोकरी व ५0 लाखाची आर्थिक मदतीची मागणी प्रशासनाकडे केली. जोपर्यत या मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. दिलीप वीर यांच्या पत्नी, मुली, मूल यासह त्यांच्या वृद्ध आईने आपल्या घरचा कर्ता पुरुष गेल्याने मोठा हंबरडा फोडला होता. तर अनेक एसटी कर्मचा-यांना आपल्या सहका-याचा असा दुदैर्वी अंत पाहून अश्रू अनावरण झाले होते. यावेळी मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबियांसह कर्मचा-यांनी ताठर भूमिका घेत एसटी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. दिवसभर संपकरी एसटी कर्मचारी आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी,पोलिस अधिकारी यांच्यात अनेकदा चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 11 =