
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित
कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनी टीव्हीच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. आपल्या देशाकडे केवळ एक दिवस पुरेल इतके पेट्रोल शिल्लक असल्याचे विक्रमसिंघे म्हणाले. आपल्याला कोणत्याही कुटुंबाला, व्यक्तींना वाचवायचे नाही. आपल्या देशाला वाचवायचे असल्याचे रानिल विक्रमसिंघे म्हणाले. नव्या पंतप्रधानांचा रोख हा माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे होता.
विक्रमसिंघे यांनी देशातील जनतेला आपल्यासाठी येणारी काही महिने अडचणींचे आणि आव्हानात्मक असतील, असे म्हटले. मी कोणत्याही सत्य आणि सद्यस्थितीला आपल्यापासून लपवणार नाही. मला जनतेशी खोटे बोलायचे नाही, असेदेखील रानिल विक्रमसिंघे म्हणाले. आपल्यासमोरील स्थिती भीतीदायक असली तरी ती वास्तव असल्याचे ते म्हणाले. मात्र, आपल्याला परराष्ट्रातून मदत मिळेल, असेदेखील रानिल विक्रमसिंघे म्हणाले.
श्रीलंकेला देशाचा कारभार चालवण्यासाठी २.६ ट्रिलियन श्रीलंकन चलनाची गरज आहे. मात्र, सरकारला सध्या १.६ ट्रिलियन महसूल मिळत आहे. श्रीलंकेसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे सरकारने पहिल्यांदा मान्य केले आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडील परकीय चलन संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे श्रीलंका इंधन तेल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करु शकत नाही. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सरकारी हवाई कंपनीचा तोटा वाढल्याने त्याचे खासगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केले. हवाई कंपनीच्या तोट्याचा भार जे लोक कधीच विमानाने प्रवास करत नाहीत त्यांनादेखील सोसावा लागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
देश प्रथमच आर्थिक संकटात
१९४८ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका पहिल्यांदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परकीय चलन संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं आतंरराष्ट्रीय बाजारातून खरेदी करता येत नाही. दुसरीकडे केवळ एका दिवसाचे पेट्रोल शिल्लक आहे. त्यामुळे श्रीलंकेत वीज कपात करण्यात आलेली आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे जनतेला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.