August 19, 2022

शेती समृद्धीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा, प्रगतिशील महिला शेतकरी भाग्यश्री कदम.

Read Time:2 Minute, 8 Second

नांदेड,दि.७ – शेती समृद्धीसाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असून, महिला देखील प्रगती साधू शकतात, असे मत प्रगतिशील महिला शेतकरी भाग्यश्री कदम यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा या सदरातील तिची अनवट वाट या महिला कट्टा कार्यक्रमात सोमवार दिनांक ७ मार्च रोजी संवाद साधला, त्या वेळी त्या बोलत होत्या. सीमा देवरे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

     पुढे त्या म्हणाल्या, शेती उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. शिकलेल्या युवकांची आज शेतीमध्ये आवश्यकता आहे. त्यांच्या शिक्षणाचा फायदा शेतीसाठी झाला पाहिजे. लग्न ठरताना मुलींनी स्वाभिमानाने उत्तम शेती व्यवसाय करणाऱ्या युवकांची वर म्हणून निवड करावी. 

     एखाद्या क्षेत्रात महिला प्रगती करत असेल तर तिच्या कामाची दखल घेतली जावी. शेतीमध्ये प्रगती साधणाऱ्या महिलेचे नाव नवऱ्यासोबत सातबाऱ्यावर यावे. घरच्यांचे खंबीर पाठबळ असेल तर महिला पुढे जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. या वेळी त्यांनी सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान शेती, बायोगॅस निर्मिती, शासनाच्या विविध योजना, शेतीमध्ये महिलांचा सहभाग यासह शेतीमध्ये राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. प्रारंभी मिलिंद व्यवहारे यांनी भाग्यश्री कदम यांचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 1 =

Close