शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत – VastavNEWSLive.com


*राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*   

 *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा*                                                                  नांदेड :-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे 30 जून पर्यंत निकालात निघाले पाहिजे, असे सक्त आदेश आज संपूर्ण जिल्हा यंत्रणेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. राज्यस्तरीय आढावा बैठकीला उपस्थित महसूल व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेला त्यांनी याबाबतीत स्पष्ट निर्देश आज दिले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व वरिष्ठ अधिकारी मुंबईतून खरीप आढावा बैठकीत सहभागी झाले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथून आदेश देत क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या,बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील संपूर्ण यंत्रणेला 30 तारखेपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याची तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे, औषध विक्री याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे जिल्ह्यातील यंत्रणेला निर्देश दिले.

खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हाट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


Post Views: 13


Share this article:
Previous Post: राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑ.के्रडीट सोसायटीच्या अध्यक्षासह 27 जणांविरुध्द गुन्हा दाखल; 86 लाख 35 हजारांची फसवणूक

June 25, 2024 - In Uncategorized

Next Post: आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्याहस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

June 25, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.