शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही

Read Time:2 Minute, 20 Second

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

याचदरम्यान, गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात घडणा-या या घडामोडींवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या की, एकनाथ शिंदे भाजपात जाणार हे म्हणणा-यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे..   शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दिल्लीसाठी रवाना होणार होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी संजय राऊत दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र राज्यातील या घडामोडी बघता संजय राऊतांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील तातडीची बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत एकनाथ शिंदेंची नाराजी कशी दूर करता येईल, महाविकास आघाडी सरकार कसं वाचवता येईल, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 14 =