
शिवसेना खासदारांत फूट, १२ खासदार शिंदे गटासोबत
नवी दिल्ली : राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढत चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनंतर आज शिवसेनेचे १८ पैकी तब्बल १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर शिंदे यांच्यासोबत या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिकाही स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारून सत्तांतर घडविल्यानंतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर हालचालींनाही वेग आला होता. अखेर आज शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला.
त्यानंतर शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या नव्या गटाला मान्यता देण्याची मागणी करणारे पत्र दिले. दरम्यान, शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. मुख्य प्रतोद यांच्या नावाने पत्र द्या, असे लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाला सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे लोकसभेत गटनेते विनायक राऊत शिंदे गटासोबत नाहीत. त्यामुळे राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याचा निर्णय घेतला आणि मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी याच कायम असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर १२ खासदारांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी १२ खासदारांच्या भूमिकेचे स्वागत केले आणि लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख केल्याचे सांगण्यात आले. २०१९ साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. जे अडीच वर्षापूर्वी झाले पाहिजे ते आम्ही आज केले आहे. १२ खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते, असे सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी आहे. त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक खासदारांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
गवळींच व्हीप मान्य करावा लागेल
शिवसेनेच्या १८ खासदारांबाबत व्हीप काढलेला नाही. तूर्तास आम्ही फक्त गटनेता बदलला असून पक्षाच्या प्रतोद आणि खासदार भावना गवळी शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावतील. शिवसेना लोकसभा गट तयार करून १२ खासदारांचे पत्र सभापतींना दिले आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.