शिवसेना कुणाची आज फैसला?

Read Time:2 Minute, 44 Second

सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

मुंबई : विधिमंडळकिंवा संसदेतील आमदार-खासदारांचे अधिकार व मतस्वातंत्र्य पक्षप्रमुखांच्या निर्णयाधीन आहे का, पक्षप्रमुखांचे अधिकार सर्वोच्च की विधिमंडळ किंवा संसदेतील बहुमताने निवडल्या गेलेल्या गटनेत्याचे अधिकार श्रेष्ठ आहेत, अशा मुद्यांवर महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राजकीय पक्षातील बंडखोर गटाने अपात्रता किंवा अन्य पक्षात विलीन होण्याच्या घटनात्मक बंधनाला बगल देण्यासाठी मूळ पक्षावरच दावा करण्याचा देशातील हा पहिलाच कायदेशीर आणि राजकीय पेचप्रसंग आहे.

या प्रकरणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे अंतिम सुनावणी होणार की अन्य पीठाकडे किंवा घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग होणार, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड रद्द करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती, त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पांिठब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय, शिंदे सरकारचा बहुमताचा प्रस्ताव आदी बाबींना सर्वोच्च न्यायालयात तीन याचिकांद्वारे आव्हान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − 5 =