शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त

Read Time:4 Minute, 16 Second

रिक्त जागांबाबत उदासीनता, राज्यात शैक्षणिक व्यवस्थेचा बोजवारा, तात्काळ पदे भरा

मुंबई : राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. नवीन पिढी घडविणा-या शिक्षकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना सरकार ही पदे भरण्याबाबत अजूनही उदासीन आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच ही पदे तात्काळ भरली जावीत, अशी मागणीही होत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळांत म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि छावणी शाळा मिळून एकूण मंजूर पदे २ लाख ४५ हजार ५९१ आहेत. यामध्ये कार्यरत पदे २ लाख १४ हजार ११९ आहेत, तर एकूण रिक्त पदांची संख्या तब्बल ३१ हजार ४७२ आहे. यावरून राज्यातील शिक्षकांविना शाळांची अवस्था किती विदारक आहे, हे स्पष्ट होते.

राज्यातील रिक्त असणा-या शिक्षकांच्या पदांबाबत माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर पदे २ लाख १९ हजार ४२८ असून कार्यरत पदे १ लाख ९९ हजार ९७६ पदे कार्यरत आहेत. रिक्त पदे तब्बल १९ हजार ४५२ आहेत.

महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मंजूर पदांची संख्या १९ हजार ९६० असून त्यापैकी ८ हजार ८६२ पदे कार्यरत आहेत. मनपा शाळांमध्ये ११ हजार ९८ पदे रिक्त आहेत. नगरपालिका शाळांमध्ये परिस्थिती मनपा आणि झेडपीच्या तुलनेत बरी आहे, असे म्हणावे लागेल. नगरपरिषदांच्या शाळांमध्ये मंजूर पदे ६ हजार ३७ असून त्यापैकी ५ हजार १३६ पदे कार्यरत आहेत, तर रिक्त पदे ९०१ आहेत.

छावणी शाळांमध्ये मंजूर पदे १६६ असून कार्यरत पदे १४५ आहेत आणि रिक्त पदे २१ आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असतानाच आहे त्या शिक्षकांवर शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

शाळाबा कामांमुळे शिक्षक बेजार
एकीकडे शिक्षकांची संख्या कमी असताना शासन शिक्षकांकडून शाळाबा कामे करून घेते. त्यामुळे बेजार झालेल्या शिक्षकांनी शासनाकडे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि शाळाबा कामातून मुक्तता करा, अशी मागणी केली होती. एकीकडून गुणवत्तेची अपेक्षा करायची, दुसरीकडे मंजूर पदे भरायची नाहीत. त्यामुळे शिक्षकांत नाराजी आहे.

गुणवत्तेचे काय?
एक तर राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच शाळाबा कामेही मोठ्या प्रमाणात लावली जातात. त्यामुळे शिक्षकांना फार मोठी कसरत करावी लागते. त्यातच गुणवत्तेची फार मोठी अपेक्षा असते. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + 15 =