शिंदे गटाचे केसरकर बॅकफूटवर

Read Time:3 Minute, 3 Second

यापुढे पत्रकार परिषदेत राणेंचे नाव घेणार नाही
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी कोणतेही वक्तव्य केले की, ते आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते. नकळत वक्तव्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी आता यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणेंचे नाव घेणार नाही, अशी सामंजस्याची भूमिका आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

केसरकर म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर आलो असलो तरी राजकारणात टीका करताना काही मर्यादा पाळायच्या असतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कधीही नाव घेऊन त्यांच्यावर टीका करत नाही. टीका करायचीच असल्यास मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख करतो. त्याचपद्धतीने आता मी राणेंचेही यापुढे कधीही नाव घेणार नाही. कारण मी राणेंबाबत काहीही वक्तव्य केले की, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या जुन्या वादाशी जोडले जाते. भाजप व शिंदे गटात वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करणे, यापुढे टाळणार असल्याचे केसरकर म्हणाले.

नितेश राणेंचीही सौम्य भूमिका
विशेष म्हणजे कालच केसरकर यांनी नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केला होता. त्यावर राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर अपेक्षित असताना नितेश राणे यांनी मात्र केसरकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. हिंदुत्वासाठी केसरकरांवर टीका न करण्याची भूमिका नितेश राणेंनी घेतली होती. त्यानंतर आता केसरकरांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

शिवसेनेतील फूट योग्य नाही
दीपक केसरकर म्हणाले, शिवसेनेतील फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली संघटना आहे. ती टीकायला हवी. तसेच राणेंशी आदरपूर्वक वागलो आहे. त्यांच्यासोबत आता कुठलाही वाद नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 1 =