August 19, 2022

शिंदेसमर्थक ३९ जणांची आमदारकी रद्द करा

Read Time:2 Minute, 20 Second

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप धुडकावून राहुल नार्वेकर यांना मतदान करणा-या शिंदे समर्थक ३९ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी नवी याचिका शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. या आमदारांनी विरोधात मतदान करून पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केला असल्याचा दावा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश शिवसेनेने पक्षाच्या सर्व आमदारांवर जारी केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबत असलेल्या ३९ आमदारांनी हा व्हीप धुडकावून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.

यामुळे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे निलंबन याचिका दाखल केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली. शिंदे गटानेही व्हीप काढला असून, शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याकडे लक्ष वेधता, शिंदे गटाचे अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.

सुप्रीम निकाल महत्त्वाचा
बंडखोरीनंतर शिवसेनेने नवीन गटनेते नियुक्त करून आधीच विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्याला एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही सरकारचे आणि शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 5 =

Close