
शाहीनची तीव्रता वाढणार
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिली. त्यामुळे आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नाही. पण गुजरातच्या किनारपट्टीवर याचा काहीअंशी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून आखाती देशांच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. हे वादळ पुढील काही तासांत तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.
शाहीन चक्रीवादळामुळे पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघर्जनेसह वादळी वा-याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असले तरी पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी धुँव्वांधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणा-या नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात, सौराष्ट्रात अधिक धोका
शाहीन चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि सौराष्ट्रच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय आज रात्री किंवा शनिवारी पहाटेपर्यंत शाहीन चक्रीवादळ तीव्र रुप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांना ३ ऑक्टोबरपर्यंत मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
सध्याचा वेग १५ कि.मी. प्रतितास
शाहीन चक्रीवादळ सध्या १५ किमी प्रतितास वेगाने भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातमधील द्वारकापासून पश्चिम उत्तर दिशेला ४९० किमी, इराणमधील चारबहार बंदरापासून पूर्व-दक्षिणेला हे चक्रवादळ ४५० किमी अंतरावर आहे. पुढील काही तासांत या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.