July 1, 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी

Read Time:4 Minute, 27 Second

परभणी/प्रतिनिधी

राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयासाठी राज्य शासनाने ६८२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामुळे परभणीकरांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली असून याबद्दल नागरीकांनी जल्लोष साजरा केला.

गेल्या अनेक वर्षापासून परभणीकरांच्या हक्काची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने बुधवार, दि.०२ मार्च रोजी मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परभणीकरांच्या जनआंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे. परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या टप्प्यात जनआंदोलन करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, वकील यांनी खा.जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाला सर्वच स्तरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो विद्यार्थांनी सहभाग नोंदवल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर खा.जाधव यांच्या मुख्य नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी सलग आठ दिवस धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनासही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.

याशिवाय खा.जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मागणीसाठी प्राणांतिक उपोषणाचा ईशारा दिला होता. परंतू, याच वेळी दि.०१ मे रोजी मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा दौ-यावर असतांना परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरीची घोषणा केली होती. त्यामुळे परत परभणीकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानंतर शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. एका उच्चस्तरीय समितीनेही शासकीय रुग्णालायाच्या उभारणी संदर्भात परभणी येथे भेट देवून पाहणी केली होती. अखेर बुधवारी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याच निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. या महाविद्यालयासाठी राज्य शासनाने ६८२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्यामुळे नागरीकातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत असून नागरीकांनी जल्लोष केला.

परभणीकरांच्या जनआंदोलनाचा विजय : खा.संजय जाधव
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाल्यामुळे सर्व परभणीकरांच्या मागणीला यश आले असून हा जनआंदोलनाचा विजय आहे. याबद्दल मुख्यमंत्री तथा आमचे पक्ष प्रमुख श्री.उध्दव ठाकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता परभणीकरांना उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातील अशी प्रतिक्रिया खा.संजय जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + 19 =

Close