January 19, 2022

शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी

Read Time:3 Minute, 47 Second

लातूर : प्रतिनिधी
विविध शासकीय विभागांच्या योजनांची अंमलबजावणी करुन त्या-त्या योजनेचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत त्या पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लातूर जिल्हा विधी प्राधिकणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांनी केले.

लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक व विधि शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी महाशिबिर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा विधी प्राधिकरण सचिव स्वाती अवसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, परिविक्षाधीन आय. एस. रहेमान शेख, जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा सरकारी वकील देशपांडे, वकील संघटनेचे काळे आदी उपस्थिती होती.

समाजातील दुर्लक्षितांना हक्काची जाणीव करून देणे हे जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे काम अविरतपणे सुरू आहे. नागरिकांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे, म्हणून आपल्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ यावा यासाठी सर्व शासकीय विभाग कार्यरत आहेत. जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही पाचशेपेक्षा अधिक खेड्यापर्यंत पोहोचलो आहोत. तसेच माहितीपत्रकांच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस, बँका अशा विविध ठिकाणी पोस्टर्स व पॉम्प्लेट हातोहात प्रत्यक्ष वाटप करण्यात आले असल्याचे सांगून न्यायाधीश कोसमकर म्हणाल्या की, कारागृहातील कैद्यांना शिक्षण, उद्योग, आरोग्यविषक प्रश्न, योगा आदिबाबतही कारागृहात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेत असून या पुढेही अविरत सुरू राहणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी शिबिरात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एस.डी. अवसेकर यांनी केले. सहदिवाणी न्यायाधीश व स्तर कुंदन कायंगुडे सूत्रसंचालन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 16 =

Close